ICHMH51NEWS.IN
9921600800

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला इचलकरंजीत खरेदीचे उधाण–  *फुलांचा सुगंध, रोषणाई आणि उत्साहाने उजळल्या बाजारपेठा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला इचलकरंजीत खरेदीचे उधाण–फुलांचा सुगंध, रोषणाई आणि उत्साहाने उजळल्या बाजारपेठा

इचलकरंजी
दिवाळीचा मुख्य सण असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला वस्त्रनगरी इचलकरंजी शहरात आज खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला. सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. सर्वत्र फुलांचा सुगंध, रोषणाईची झळाळी आणि खरेदीच्या गजबजाटामुळे संपूर्ण शहर सणमय वातावरणाने उजळले.
Advt
शहरातील महात्मा गांधी चौक,ते मलाबादे जनता चौक शिवतीर्थ ,शाहु कॉर्नर व्यंकटराव हायस्कूल रोड, डेक्कन चौक ,जय सांगली रोड तर शाहु महाराज पुतळा रोड तसेच मुख्य रोड परिसरात सोनं, चांदी, कपडे, गृहउपयोगी वस्तू, मिठाई, फटाके आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची रेटारेटी सुरू होती. सोनार गल्ली आणि ज्वेलर्स दुकांनांमध्ये सोन्याच्या नाण्यांपासून ते हलक्या वजनाच्या दागिन्यांपर्यंत खरेदीचा ओघ वाढलेला दिसला. महिलांनी पारंपरिक तसेच आधुनिक अलंकार खरेदीत उत्साह दाखवला.
कपड्यांच्या दुकानांमध्येही महिलांचे आणि युवकांचे मोठे आकर्षण पाहायला मिळाले. साडी, कुर्ते, लेहेंगा, सूट, वेशभूषा तसेच मुलांच्या कपड्यांच्या खरेदीत मोठी उलाढाल झाली. गृहउपयोगी वस्तूंमध्ये नवीन भांडी, दिवे, सजावटीची आयटम, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होती.
फुलबाजारात झेंडू, कमळ, रोजमेळ आणि गुलाबफुलांचा खच पडला होता. झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने यंदा दर स्थिर राहिले आणि ग्राहकांच्या आवाक्यात राहिले. लक्ष्मीपूजनासाठी वह्या, नारळ, अगरबत्ती, फुलमाळा, आणि विविध पुजासाहित्य खरेदीसाठी सकाळपासून गर्दी झाली. महिलांनी कलात्मक सजावटीच्या फुलांच्या माळा व घर सजावटीसाठी वस्तूंची खरेदी करून बाजारपेठ रंगीबेरंगी केली.
शहरातील प्रमुख चौकांवर व्यापाऱ्यांनी आकर्षक विद्युत रोषणाई, दिव्यांच्या सजावटीने दुकानांना नवे रूप दिले. रात्रीच्या वेळी या रोषणाईमुळे शहर उजळून निघाले. मिठाईच्या दुकानांत विविध प्रकारच्या फराळाचे आणि खास दिवाळीतील पदार्थांचे आकर्षण पाहायला मिळाले.
फटाक्यांच्या दुकानांनाही चांगला प्रतिसाद मिळत असून, पालकांनी लहान मुलांसाठी मर्यादित प्रमाणात फटाके खरेदी केल्याचे दिसून आले. व्यापार्‍यांनीही या दिवाळीपूर्वीच्या विक्रीला समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला आलेले हे खरेदीचे उधाण पाहता, इचलकरंजी शहरात सणासुदीचा उत्साह आणि आनंदाची लाट उसळल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा