भारतात जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता-डॉ ज्ञानेश्वर मुळे
इचलकरंजी:
वाढती आर्थिक विषमता, त्यातून वाढणारे दारिद्य्र, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होणारा विनाश, वाढत चाललेला मानवी विद्वेष आणि सामाजिक सौहार्दाचा अभाव हे आजचे जागतिक पातळीवरील महत्वाचे प्रश्न आहेत. अशा परिस्थितीच्या चक्रव्युहात अडकलेल्या सर्वसामान्य जनतेची अभिमन्यूसारखी अवस्था झाली आहे.पण कोणत्याही संकटावर उपाय नाही असे नसते. नागरिकांनी तर्कशुद्ध विचार केला पाहिजे. भारताला आपल्या राज्यघटनेची मूलभूत स्वरूपाची सुंदर चौकट मिळाली आहे.त्या मूल्यांवर आधारित जनतेचा जाहीरनामा जनतेने आपली विविधतेतील एकता जपत आणि तिचा आग्रह धरत तयार केला पाहिजे.तो करता येऊ शकतो. कारण भारतात जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे .भारतीय जनमानसात ती शक्ती आहे,असे मत माजी परराष्ट्रसचिव, राष्ट्रीय मानव आयोगाचे सदस्य व जेष्ठ साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी आणि डॉ.ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ” जागतिक घडामोडी आणि आपण ” या विषयावर बोलत होते. प्रारंभी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रस्ताविक आणि डॉ.मुळे यांचा परिचय करुन दिला.जयकुमार कोले यांनी डॉ.मुळे यांचे शाल, ग्रंथ आणि बुके देऊन स्वागत केले. यावेळी विचारमंचावर डॉ.ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनचे संजय मुळे उपस्थित होते.
Advt
डॉ.ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, जगाचा मुखिया अमेरिका झाला. चांगल्या आणि वाईट गोष्टीही त्यांनीच आणल्या. जगात युद्ध नसते तेव्हा अमेरिका ते तयार करते.तेथे स्वातंत्र्य या संकल्पनेचा मुक्तहस्ते वापर होत असे.पण आता परिस्थिती बदलली आहे. जागतिक संस्थांच्या पायाला सुरुंग लावले जात आहेत.चीन व रशिया परिस्थिती बदलाचा लाभ घेत आहेत.अनिश्चित परिस्थितीचा लाभ भारताने अधिक जबाबदारीने घेतला पाहिजे. विश्वमित्र आपल्याला व्हायचे असेल तर शेजारी राष्ट्रांशी संबंध सुरळीत होण्याकडे लक्ष द्यावे लागेल.भारत सुरक्षा परिषदेचा सभासद नाही पण मनुष्यबळाची जागतिक राजधानी आणि प्रचंड बाजारपेठ ही आपली बलस्थाने आहेत.ती ओळखून तशी धोरणे आखून अंमलात आणली पाहिजेत. केवळ आर्थिक विकास म्हणजे प्रगती नसते. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा ठराविकांकडे जात आहे. पर्यावरणाचा नाश करून स्वखुशीने आत्महत्येचा मार्ग निवडला जात आहे. कडवेपणातून कटुता निर्माण केली जात आहे. तो टाळून हा देश मूल्यांवर नव्याने बांधला पाहिजे. विभागणी टाळून चरित्र बांधणी केली पाहिजे.
डॉ. मुळे पुढे म्हणाले, बदलत्या जागतिक परिस्थितीचा लाभ भारताला मिळवायचा असेल तर काही अंतर्गत बदल अपरिहार्य आहेत. निवडणूक प्रक्रियेत अमुलाग्र बदल, जीवनावश्यक गोष्टी सर्वांना मिळणे, राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी सुसंवाद वाढणे, कार्यपालिकेत बदल, न्यायपालिका व पोलिस यांच्या कार्यक्षमतेत बदल झाला पाहिजे. न्यायालय व पोलिसांत जाताना प्रगत देशात नागरिकांना आत्मविश्वास असतो शंका नसते हे लक्षात घेतले पाहिजे. लोकांनी पूर्वग्रह बाजूला ठेवून सक्रिय झाले पाहिजे. त्यासाठी सामाजिक चळवळी सुदृढ केल्या पाहिजेत. सार्वजनिक जीवनात देव, धर्म, सणसमारंभ यांचा वाढता वावर, दोन तृतीयांश जनता निरुपयोगी वाटणे, मोठ्या प्रमाणात जनता स्क्रीनमध्ये मश्गूल असणे, राजकारणाचे गुन्हेगारीकरण होणे, तर्कनिष्ठ व तत्वनिष्ठ वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूस जाणे, रशियाप्रमाणे एक पक्षीय अथवा एक व्यक्तीय व्यवस्थेकडे जाणे धोक्याचे आहे. माणसे जवळ येण्याचा आणि दूर जाण्याचाही हा काळ आहे. राजकरणातील थिंकटँकचा केवळ टँक होऊ देता कामा नये. अशावेळी संविधानिक चौकट, अस्सल व व्यापक भारतीय परंपरा यांचे प्रबोधन विस्तारित करण्याची गरज आहे.डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या अतिशय अभ्यासपूर्ण प्रभावी मांडणीनंतर या विषयावर खुली चर्चा झाली. श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना व शंकांना डॉ. मुळे यांनी समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमाला इचलकरंजी व परिसरातील जिज्ञासू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ मुळे यांचा सत्कार करताना जयकुमार कोले,शेजारी संजय मुळे व प्रसाद कुलकर्णी
मार्गदर्शन करताना डॉ ज्ञानेश्वर मुळे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








