१७२ रक्तदात्यांनी हुतात्मा कोठारी बंधूंच्या बलिदानाला स्मरून केले रक्तदान
इचलकरंजी :
श्री राम मंदिर निर्मितीत सर्वोच्च बलिदान दिलेल्या हुतात्मा कोठारी बंधू यांच्या सन्मानार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व्यंकटराव हायस्कूल येथे करण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून तब्बल १७२ रक्तदात्यांनी रक्तदान करून कोठारी बंधूंच्या बलिदानाला अभिवादन केले.
Advt
रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीराम पंचायत व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमास परमपूज्य प्राणलिंगेश्वर स्वामी, बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन, दुर्गा वहिनी प्रांत सहसंयोजिका गायत्री देशपांडे कुंभार,विभाग मंत्री शिवजी व्यास, जिल्हामंत्री सुजित कांबळे, व्यंकटराव हायस्कूलचे अध्यक्ष कौशिक मराठे, सहमंत्री प्रवीण सामंत, दुर्गा वहिनी संयोजिका कु. राजलक्ष्मी आमणे, सोमेश्वर वाघमोडे, बाळासाहेब ओझा तसेच अन्य सामाजिक मान्यवर व बजरंगी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना नितीन महाजन म्हणाले की, “श्री कोठारी बंधूंचे बलिदान हे समस्त हिंदू समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित या रक्तदान शिबिरातून समाजात राष्ट्रसेवेची भावना दृढ व्हावी, हेच आमचे उद्दिष्ट आहे. सेवा, सुरक्षा आणि संस्कार या माध्यमातून प्रत्येक हिंदूने राष्ट्रहितासाठी कार्यरत राहिले पाहिजे.”
रक्तदात्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिराच्या वेळी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणीचेही आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी व्यंकटराव हायस्कूल, इचलकरंजी व संजीवन ब्लड बँक, कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व बजरंगी, विजेता ग्रुप व हिंदू शिकलगार समाज यांनी विशेष प्रयत्न केले. समाजाला गरज लागल्यास भविष्यातही अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा विश्वास बजरंग दल इचलकरंजी तर्फे व्यक्त करण्यात आला.
रक्तदात्याना प्रमाणपत्र वितरित करताना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







