रेणुकामाता मंदिरातील चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई
इचलकरंजी
इचलकरंजी पंचक्रोशितील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नदिघाट येथील रेणुकामाता मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा केवळ २४ तासांत उघडकीस आणण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
या कारवाईत चोरीस गेलेली रोख रक्कम ४,००० रुपये, डी.व्ही.आर. मशीन (किंमत १५,००० रुपये) तसेच चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि साधने असा एकूण ३९,००० रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपशील:
फिर्यादी महेश मनोहर अंबरोळे (वय ५५, रा. रेणुका मंदिर शेजारी, नदिघाट, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गर्भगृहातील लोखंडी शटरचे खुट कापून व साखळीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या दरम्यान त्यांनी रोख रक्कम व डी.व्ही.आर. मशीन चोरीस नेले.
या घटनेचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान श्रेयस दिपक पोळ (वय २३, रा. अष्टविनायक कॉलनी, इचलकरंजी) आणि रमेश दादू टोणपे (वय २०, रा. माळभाग, शिरोळ) या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री ११ अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली रोख रक्कम व डी.व्ही.आर. मशीन जप्त केले. प्राथमिक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कारवाईत पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक शरद वायदंडे, मपोसई उर्मिला खोत, सहा. फौजदार रावसाहेब कसेकर, पो. अं. गजानन बरगाले, पवन गुरव, गणेश सनदी, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, प्रमोद चव्हाण, अरविंद माने (शिवाजीनगर पोलीस ठाणे) यांनी ही कारवाई केली.पुढील तपास: मपोसई उर्मिला खोत या करीत आहेत.
२४ तासात गुन्हा उघड करून ताब्यात घेतलेल्या आरोपीसह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








