ICHMH51NEWS.IN
9921600800

संविधानाच्या मूल्यांच्या आधारे आपल्या वाटचालीची समीक्षा आवश्यक- डॉ सुभाष इंगळे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संविधानाच्या मूल्यांच्या आधारे आपल्या वाटचालीची समीक्षा आवश्यक- डॉ सुभाष इंगळे

इचलकरंजी :

भारतीय संविधान म्हणजे मानवाला केंद्रबिंदू मानून सर्व जाती,धर्म, पंथाच्या नागरिकांना देश म्हणून एकत्र आणणारा आणि सर्वांगीण समतेच्या दिशेने जाणारी मूल्यव्यवस्था निर्माण करणारा तत्वग्रंथ आहे. म्हणूनच संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्यांची राष्ट्रीय प्रस्थापना करण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने हा दिवस साजरा केला पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन याप्रमाणे संविधान दिन हा सुद्धा राष्ट्रीय दिन आहे. संविधानाच्या मूल्यांच्या आधारे आपली वाटचाल होत आहे की नाही याची समीक्षा आपण केली पाहिजे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व वनस्पतीशास्त्रतज्ञ प्रा. डॉ.सुभाष इंगळे यांनी व्यक्त केले. ते  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन कार्यक्रमात ” माझे संविधान माझा अभिमान “या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी  प्राचार्य प्रो.डॉ.त्रिशला कदम होत्या. समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी आणि महिला अधीक्षक समाज कल्याण विभाग श्रेया कुसुरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ.सुभाष इंगळे म्हणाले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते.आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. संविधान समितीतील सर्व मान्यवर मंडळींनी एकत्र येऊन आपल्या संविधानाची निर्मिती केली.व्यक्ती म्हणून संरक्षण, न्याय आणि मानवतेचे अधिकार संविधानाने आपल्या प्रत्येकाला दिले. सर्वांगीण विषमता नष्ट करणारी धोरणे संविधानानी दिली. आपल्या मनात मानवी मूल्यांची चेतना निर्माण करणे हे आपलं कर्तव्य आहे. व्यक्ती, कुटुंब आणि राष्ट्र या सर्व पातळीवर संविधानाच्या मूल्यांचे महत्त्व मोठे आहे. आपण प्रत्येकाने माणूस ते माणूस या पद्धतीने या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. प्रा.डॉ.सुभाष इंगळे यांनी आपल्या अतिशय ओघवत्या शैलीतील भाषणात माझे संविधान माझा अभिमान हा विषय सखोलपणे मांडला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य प्रो.डॉ.त्रिशला कदम म्हणाल्या , संविधान हा जगातील सर्वात मोठा सामाजिक दस्तऐवज आहे.भारताने जगाला दिलेली ती अनमोल देणगी आहे. आपल्या संविधानाच्या मूल्यांच्या वृद्धीसाठी आपण काय करतो याचा विचार विद्यार्थिनींनी आणि सर्वांनीच केला पाहिजे. यावेळी प्रसाद कुलकर्णी व श्रेया कुसुरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वर्षा पोतदार यांनी प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय करून दिला.प्रा.डॉ.मनोज जाधव यांनी सरनाम्याचे सामूहिक वाचन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ.धीरज शिंदे यांनी आभार मानले. प्रा. प्रिया सुतार यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील अध्यापक, अध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संविधान दिन कार्यक्रमात बोलताना प्रा.डॉ.सुभाष इंगळे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा