इचलकरंजीत सराफ–सुवर्णकारांसाठी मार्गदर्शनपर सेमिनार उत्साहात संपन्न
इचलकरंजी :
इचलकरंजी परिसर सराफ व सुवर्णकार असोसिएशन यांच्या पुढाकाराने जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, मुंबई (GJEPC) तसेच इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंज, गिफ्ट सिटी गांधीनगर (IIBX – 11BX) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सराफ–सुवर्णकार मार्गदर्शनपर सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सेमिनारमध्ये इचलकरंजी शहर व परिसरातील तसेच बंगाली सुवर्णकार कारागीरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल २०० पेक्षा अधिक कारागीर परिचयपत्रांची (ID Card) यशस्वी नोंदणी केली. हे परिचयपत्र शासनमान्य असल्याने दागिन्यांच्या वाहतुकीसाठी ओळखीचा अधिकृत पुरावा ठरणार आहे. तसेच तीन वर्षांचा मोफत आरोग्य विमा (हेल्थ मेडिक्लेम) व विविध शासकीय योजनांचा लाभ यामधून मिळणार आहे.
सेमिनारची सुरुवात GJEPC चे वरिष्ठ संचालक श्री. मिथिलेश पांडे, श्रीमती नाहिद सुनके, 11BX चे श्री. मुकेश शर्मा, तसेच इचलकरंजी परिसर सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सचिन देवरुखकर व संचालक मंडळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. संचालक श्री. विजय मडके यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी श्री. मिथिलेश पांडे यांनी GJEPC मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत, सुवर्णकार कारागिरांना आयात–निर्यातीच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. IEC कोड नोंदणी, भारतीय डाक निर्यात केंद्रातून घरबसल्या निर्यात सुविधा तसेच नवी मुंबईतील ‘भारत रत्नम’ प्रकल्पात उत्पादनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
GJEPC च्या श्रीमती नाहिद सुनके यांनी इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो (IIJS) चे महत्त्व विशद करत जागतिक दागिन्यांच्या ट्रेंडची माहिती मिळवण्यासाठी अशा प्रदर्शनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
तर 11BX चे श्री. मुकेश शर्मा यांनी भारतीय बुलियन एक्स्चेंजची कार्यपद्धती समजावून सांगत अधिकृत सदस्यांना कमी दरात सोने व चांदी खरेदी करण्याची सुविधा असल्याचे स्पष्ट केले.
कोल्हापूर येथील कर सल्लागार श्री. दिपेश गुंदेशा यांनी मध्यम व लहान सराफ व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करत डिजिटल बिलिंग, GST, HUID हॉलमार्किंग, ज्वेलरी सॉफ्टवेअर, कायदेशीर नियमांचे पालन यांचे महत्त्व अधोरेखित केले. योग्य बदल व नियमांची अंमलबजावणी केल्यास व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कु. सुहाना यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सचिन देवरुखकर यांनी केले.
या सेमिनारला ३०० ते ३५० सराफ व सुवर्णकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजाराम कदम (उपाध्यक्ष), जतीन पोतदार (सचिव), सचिन कापसे (खजिनदार), सुनील चौगुले, सुहास आवळकर, नितीन पोतदार, इम्तियाज शेख, विकास यादव, विजय मडके, महेश साळवी, नितीन चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुवर्णकाराना परिचय पत्र प्रदान करण्यात आले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




