गझलेचे अंतरंग गहिरे होण्यासाठी व्यासंग व रियाज गरजेचा ….प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
इचलकरंजी ता.२५ सर्व बाबींप्रमाणे गझलेलाही अंतरंग आणि बहिरंग या दोन महत्त्वाच्या बाजू असतात. गझलेचे बहिरंग तिच्या वृत्त, यमक, अंत्ययमक आदी बाह्यात्कारी ठेवणीतून स्पष्ट दिसते. तर गझलेचे अंतरंग तिच्या मांडणीतील भावना, सखोलता, साक्षात्कारातून व्यक्त होत असते. गझलेच्या रचनातंत्रामध्ये तिच्या बहिरंगाची अपरिहार्यता असतेच. मात्र गझलेला रसिकांची दाद मिळायची असेल, ती आपल्यानंतरही टिकायची असेल तर तिचे अंतरंग गहिरे करण्याची क्षमता गझलकाराच्या मनोभूमीकेवर , व्यासंगावर आणि मांडणीच्या कौशल्यावर अवलंबून असते. त्यासाठीचा रियाजही आवश्यक आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते रेणुका गझल मंचच्या बावन्नाव्या कार्यशाळेमध्ये ” गझलेचे अंतरंग ” या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी रेणुका गझलमंचचे संस्थापक डॉ. रे.भ. भारस्वाडकर, कार्यशाळा प्रमुख प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा ,समूहसमन्वयक आत्माराम कदम , मार्गदर्शक बापू दासरी, गौतम सूर्यवंशी,डॉ.राज रणधीर आदींची प्रमुख उपस्थिती होती. गझलकारा शोभा वागळे यांनी स्वागत, प्रस्ताविक केले.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांनी ” “मोकळे करून टाक एकवार अंतरंग ” अशी एका वेगळ्या संदर्भात लिहिलेली ओळ असली तरी ती अंतरंग मोकळे करणे, होणे फार महत्त्वाचे असते हे ज्या पद्धतीने अधोरेखित करते तसेच महत्व गझलेच्या अंतरंगाबाबतही आहे. मानवी जीवनातील सर्व अनुभूतीची मांडणी गझल करत आलेली आहे. त्यातून तिचे अंतरंग रसिकांपुढे व्यक्त झालेले आहे. अंतरंगातील भावांदलोने कमीतकमी शब्दात व्यापक आशयघनतेने मांडणे हे गझलकाराचे कौशल्य त्याच्या आणि परिणामी गझलेच्या अंतरंगाची खोली दाखवत असते. गझलेमध्ये व्याकरणाइतकीच गझलीयतही महत्त्वाची असते. माणसांची दुरावा ठेवून यंत्राशी, समाजमाध्यमांशी जवळीक ठेवण्यातून सकस गझल निर्माण होणार नाही. समाजमाध्यमानी एक आभासी, मायावी विश्व निर्माण केलेले आहे. त्यापासून गझलकारांनी सावध राहिले पाहिजे. तसे झाले तर बाह्यरंगाइतकाच किंबहुना अंतरंग अधिक महत्त्वाचा आहे याची जाणीव आपल्याला होऊ शकेल. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील मांडणीमध्ये गझलेच्या अंतरंगाचे आणि एकूणच काव्यप्रकाराचे अनेक उदाहरणे देऊन विवेचन केले. यावेळी डॉ. रे.भ.भारस्वाडकर, प्रा.सुनंदा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या विविध भागातील कवी, गझलकार सहभागी झाले होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







