उमेदवारी यादीवरील नाराजीचा भडका वाढत्या असंतोषामुळे महायुतीला उमेदवार जाहीर करण्यात अडथळा
विशेष वृत्त- अभिजित पटवा
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट) यांच्यावतीने उमेदवार निवडीची प्रक्रिया गतीने सुरू असताना, वाढत्या नाराजीमुळे उमेदवारांची अंतिम यादी स्थगित ठेवण्याची वेळ महायुतीवर आली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला नामुष्कीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारीची प्राथमिक यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काही इच्छुकांना दूरध्वनीवरून उमेदवारी निश्चित झाल्याचे कळवून तातडीने प्रचाराला लागण्याचे निर्देश देण्यात आले. अनेकांनी प्रचारही सुरू केला; मात्र मोठ्या प्रमाणात निष्ठावंत कार्यकर्त्यांना व स्थानिक इच्छुकांना वगळल्याने नाराजीचा सूर चढू लागला.
काही प्रभागांमध्ये विधानसभेला विरोधात काम केलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे जुन्या कार्यकर्त्यांना कोपऱ्यात ढकलल्याची भावना व्यक्त होत आहे. विक्रमनगर परिसरातील प्रभाग क्र. ६ मध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे दीपक पाटील यांच्या समर्थकांनी उघड नाराजी व्यक्त करत “भाजपाला मतदान न करण्याचा इशारा” देत, अधिकृत उमेदवारांना प्रचार करू न देण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी सपत्नीक शिवशाहू विकास आघाडीत प्रवेश करून आवाडे गटाला धक्का दिला. यापूर्वी “जिथे आवाडे तिथे महावीर जैन” असे समीकरण असताना, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलल्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.
सोशल मीडियावरही अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ‘आमच्या निष्ठेचे हेच फळ का?’ असा सवाल उपस्थित करत पक्ष नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. वाढत्या असंतोषामुळे तक्रारींचा पाढा राज्य नेतृत्वापर्यंत पोहोचला.
या घडामोडींनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर व मकरंद देशपांडे उपस्थित राहणार आहेत. काही प्रभागांत उमेदवार बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून, “सुधारित उमेदवार यादी बैठकीनंतर जाहीर होईल,” अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
शहरातील राजकीय वातावरण तापल्याने आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीला समन्वयाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
उमेदवारी नाकारल्याने जनतेच्या उपस्थितीत दीपक पाटील यांना अश्रू अनावर झाले
माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी शिव शाहू विकास आघाडीत प्रवेश केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






