ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प,पाणीप्रश्न सोडवण्याची भूमिका शिव-शाहू विकास आघाडीचा जाहीरनामा.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प,पाणीप्रश्न सोडवण्याची भूमिका शिव-शाहू विकास आघाडीचा जाहीरनामा.

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिव-शाहू विकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार राजूबाबा आवळे,मदन कारंडे, सागर चाळके,शशांक बावचकर,अभिजित रवंदे तसेच आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शहराच्या शाश्वत, नियोजनबद्ध आणि नागरिकाभिमुख विकासाचा ध्यास घेत हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे आघाडीने स्पष्ट केले. केवळ सत्ता मिळविणे हा उद्देश नसून, सत्तेचा पारदर्शक आणि लोकहितकारी वापर करून शहरात ठोस बदल घडवण्याची हमी आघाडीने व्यक्त केली.
जाहीरनाम्यात इचलकरंजीतील दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने हाताळण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. विशेषतः पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्था, शिक्षण, क्रीडा, रस्ते दुरुस्ती, पर्यावरण संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, बाग-बगीचे, महिलांचे सक्षमीकरण आणि नगररचना विषयक उपक्रमांची तपशीलवार मांडणी करण्यात आली आहे.
शहरातील पाणीटंचाईचा कायमस्वरूपी तोडगा काढून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्धार जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे आधुनिकीकरण करून १०० खाटांची सुसज्ज सुविधा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. कचरा संकलनात नियमितता, आसरा नगर येथील घनकचरा प्रकल्पाचा पूर्ण क्षमतेने वापर, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वच्छतेचा दर्जा उंचावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रात महानगरपालिकेच्या शाळांचे बळकटीकरण, मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, तसेच घटलेल्या विद्यार्थी संख्येसाठी विशेष उपक्रम राबविण्याचे धोरण जाहीरनाम्यात मांडले आहे. याशिवाय क्रीडांगणांचा विकास, खड्डेमुक्त रस्त्यांची अंमलबजावणी, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रसार, पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन यावरही आघाडीने भूमिका स्पष्ट केली आहे.
महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित देखभाल, नगररचना योजना क्रमांक १ व २ मधील प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि महापालिकेच्या स्वतःच्या मालमत्तांचा वापर करून आर्थिक स्त्रोत वाढवण्याचे धोरणही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील हक्क, विकास आणि स्वाभिमान जपण्याच्या हेतूने नागरिकांसमोर हा जाहीरनामा ठेवण्यात आल्याचे शिव-शाहू विकास आघाडीने सांगितले असून, सत्तेत आल्यानंतर जाहीरनाम्यातील आश्वासने प्रभावीपणे अंमलात आणण्याची हमीही त्यांनी दिली आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा