जीएसटी स्क्रॅप टेंडरच्या नावाखाली ४५ लाखांची फसवणूक; एकाला अटक
इचलकरंजी
इचलकरंजीतील बंडगर मळा चौकात राहणारे व स्क्रॅप व्यवसाय करणारे तौफिक खान यांची जीएसटी स्क्रॅप टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
कुरुंदवाड येथील शोयब अथणीकर आणि रसुल शेख हे दोघे तौफिक खान यांच्या कार्यालयात भेटीस आले होते. यावेळी अथणीकर याने रसुल शेख हा कोल्हापुरातील जीएसटी कार्यालयातील अधिकारी असल्याची ओळख करून दिली. शेख याने जीएसटी न भरलेल्या कंपनीची मशिनरी जप्त करून त्याचा स्क्रॅप टेंडर देणार असल्याचे सांगितले. टेंडर घेण्यास इच्छुक असाल तर तो मिळवून देतो, असे आश्वासनही दिले.
याशिवाय, शिरोली औद्योगिक वसाहतीत अशाच प्रकारचे स्क्रॅप टेंडर देण्यात आल्याचे सांगत, टेंडर भरल्यास निश्चित फायदा होईल, असेही अथणीकर याने सांगितले. स्क्रॅपची किंमत दीड कोटी रुपयांच्या घरात असून टेंडरची रक्कम ५५ लाख रुपये ठरेल. त्यापैकी ५० टक्के रक्कम सुरुवातीला ऑनलाईन भरावी लागेल, असे सांगण्यात आले.
या आमिषाला बळी पडत तौफिक खान यांनी ३० मार्च २०२२ ते ९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बँकेमार्फत आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे एकूण ४५ लाख रुपये भरले. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही टेंडर निघाले नाही. अखेर कोल्हापुरातील जीएसटी कार्यालयात चौकशी केली असता रसुल शेख हा अधिकारी नसून शिपाई असल्याचे स्पष्ट झाले. त्याने यापूर्वीही अनेकांना स्क्रॅप टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती समोर आली.
यानंतरही रक्कम परत मिळावी किंवा टेंडर मिळावे यासाठी पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तौफिक खान यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
आरोपी रसूल शेख
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







