लिगाडे मळ्यात स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी उघड; नगरसेवक राजू बोंद्रेंच्या हस्तक्षेपाने शिधापत्रिकाधारकांना न्याय
इचलकरंजी
लिगाडे मळ्यातील स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य न देता कमी धान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मनमानीविरोधात संतप्त शिधापत्रिकाधारकांनी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर बोंद्रे यांनी तत्काळ संबंधित दुकानात भेट देत चौकशी केली व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर दुकानदारास नियमानुसार देय असलेले धान्य देण्यास भाग पाडण्यात आले.
लिगाडे मळ्यातील स्वस्त धान्य दुकानातून मनोज कुंभार यांनी गेल्या महिन्यात कुटुंबातील व्यक्तिनिहाय धान्य न देता कमी धान्य दिले होते. १३ जानेवारीपासून बंद असलेले दुकान पुन्हा सुरू झाल्यानंतरही प्रत्येक शिधापत्रिकेतील १ ते २ व्यक्तींचे धान्य कमी दिले जात होते. हा प्रकार निदर्शनास येताच शिधापत्रिकाधारकांनी नगरसेवक बोंद्रे यांच्याकडे धाव घेतली.
बोंद्रे यांनी प्रत्यक्ष दुकानात जाऊन विचारपूस केली असता कमी धान्य दिल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर त्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती देत, संबंधित दुकानदारावर कारवाई करावी तसेच मागील व चालू महिन्याचे नियमानुसार पूर्ण धान्य देण्याची मागणी केली. पुरवठा अधिकाऱ्यांनी ज्यांना कमी धान्य मिळाले आहे त्यांना नियमानुसार धान्य दिले जाईल, तसेच चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, महापालिका निवडणूक निकालानंतर सत्कार कार्यक्रमांमध्ये अडकून न पडता नगरसेवक झाल्यानंतर अवघ्या २-३ दिवसांतच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी राजू बोंद्रे यांनी पुढाकार घेतल्याने परिसरात सकारात्मक चर्चा सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी वाढत असल्याने प्रत्येक दुकानाची तपासणी करण्यात येणार असल्याचेही बोंद्रे यांनी स्पष्ट केले.
रेशन धान्य दुकानदाराच्या मनमानी विरोधात नागरिकांचे म्हणणे ऐकताना नगरसेवक राजु बोंद्रे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







