कन्या महाविद्यालयात ज्ञानशिदोरी दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन
इचलकरंजी:
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानशिदोरी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी स्पर्धा परीक्षा विभागास दहा हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट म्हणून दिली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री आण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले येथील मराठी विभागाचे प्रा. प्रो. डॉ. अमर कांबळे उपस्थित होते. त्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. ध्येय उच्च ठेवून सातत्याने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी सांगितले. विविध स्पर्धा परीक्षा, त्यांची रचना, नियम, परीक्षा पद्धती व मुलाखत तंत्र याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम होत्या. त्यांनी माननीय अभयकुमारजी साळुंखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विद्यार्थिनींनी उपलब्ध पुस्तकांचा प्रभावी वापर करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. मनोज जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रियांका साळोखे व प्रा. शाहीन फकीर यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी मानले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख समन्वयक प्रा. वर्षा पोतदार यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा.अमर कांबळे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







