ICHMH51NEWS.IN
9921600800

सामाजिक समरसता मंचामार्फत ‘बंधुता परिषद’ उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक समरसता मंचामार्फत ‘बंधुता परिषद’ उत्साहात संपन्न

इचलकरंजी:
२ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ सामाजिक समरसता मंचामार्फत कोल्हापूर येथे ‘बंधुता परिषद’ सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या परिषदेस दलीत महासंघचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे आणि देहूरोड धम्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त क्षितिज टेक्सास गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
   बुद्धवंदना आणि सांघिक गीताने संदीप कांबळे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. राजेश पवार यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. गेल्या काही वर्षांपासून या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने बंधुता परिषदेचे आयोजन केले जात आहे.
   यावेळी क्षितिज गायकवाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशावर प्रचंड प्रेम होते. त्यांनी भारतीय भूमीतील बौद्ध धर्म स्वीकारला. आज बुद्ध घराघरांत पोहोचत आहे आणि भविष्यात लोकांच्या मनातही पोहोचेल. शांततेने आणि समजुतीने विचारांचा प्रसार होणे आवश्यक आहे.
    तर मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बंधुता परिषदा महाराष्ट्रासह देशभर व्हायला हव्यात. मतभेद असूनही संवाद महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत असलेले अनेक गैरसमज प्रत्यक्ष अनुभवातून दूर झाले आहेत. विविध जाती-समूहांचे प्रतिनिधित्व संघामध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेत संघाकडे आपुलकीने पाहण्याची भूमिका त्यांनी मांडली.
    सूत्रसंचालन विजय पुजारी यांनी केले. व्यासपीठावर प्रा. भिसे, वसुधा वसंतराव शिर्के उपस्थित होते. सामाजिक समरसता मंचाचे सुनील वांकर यांनी आभार मानले. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद ढोले, केदार जोशी, कैलास काईगडे, रवी मिसाळ, अमर कांबळे, तानाजी रावळ, स्वप्नील नाईक, विद्या कामत आणि किशोर गायकवाड यांनी सहकार्य केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा