इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी उदय धातुंडे, उपमहापौरपदी अनिल डाळ्या बिनविरोध
इचलकरंजी :
येथील नवनिर्मित इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे तर उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी सर्व पक्षांचे नगरसेवक व सदस्यांना विश्वासात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याची ग्वाही दिली.
महापौर निवडीनंतर उदय धातुंडे समर्थकांनी गुलालाची उधळण करत शहरातून जल्लोषी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक सहलीहून परतल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह सर्व सदस्य अटल बिहारी वाजपेयी चौकातून चालत महापालिकेच्या सभागृहात दाखल झाले.
पीठासीन अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिली सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच शिव शाहू आघाडीचे महापौरपदाचे उमेदवार सयाजी चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी अपेक्षित असलेला सात दिवसांचा कालावधी न देता केवळ दोन दिवस देण्यात आल्याचा आक्षेप नोंदवत महापौर निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र पिठासीन अधिकारी संजय शिंदे यांनी सभेचे कामकाज कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत हा आक्षेप फेटाळून महापौर निवड प्रक्रियेला सुरुवात केली.
विशेष म्हणजे अर्ज छाननीनंतर निवड प्रक्रियेवर आक्षेप घेणारे सयाजी चव्हाण यांनीच महापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पिठासीन अधिकारी शिंदे यांनी उदय धातुंडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून संगिता आलासे यांनी माघार घेतल्याने अनिल डाळ्या यांचीही उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
पिठासीन अधिकारी संजय शिंदे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते नूतन महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना (शिंदे गट) गटनेते रविंद्र माने, भाजपचे विठ्ठल चोपडे, शिव शाहू आघाडीचे गटनेते उदयसिंग पाटील, मदन कारंडे, तानाजी पोवार, रवि रजपुते, संतोष शेळके, संजय तेलनाडे, ध्रुवती दळवाई, अलका स्वामी, क्रांती आवळे,मनीषा नवनाळे आदी नगरसेवकांनी मनोगत व्यक्त केले.
महापौर उदय धातूंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांचा सत्कार करताना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे,आयुक्त पल्लवी पाटील
महापौर व उपमहापौर सभागृहात पदभार स्वीकारण्या साठी येत असतानाचे छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








