विकासासाठी निधीपेक्षा व्हिजन महत्त्वाचे – मंत्री चंद्रकांत पाटील
इचलकरंजी :
विकास कामांना निधीची कमतरता भासत नाही, तर विकासासाठी स्पष्ट व्हिजन असणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. येथील इचलकरंजी महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
इचलकरंजी महापालिकेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, केवळ मूलभूत नागरी सुविधांपुरते मर्यादित न राहता नूतन नगरसेवकांनी विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवावा. जगातील इतर देशांचा आर्थिक विकास कसा झाला, तिथे कोणते बदल झाले आणि तशाच धर्तीवर आपल्या शहरात व देशात सकारात्मक बदल कसे करता येतील, याचा विचार करण्याची गरज आहे. विकासाची स्पष्ट दिशा असेल तर निधी कधीही कमी पडत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
मंत्री पाटील यांनी इचलकरंजी महापालिकेचा प्रलंबित जीएसटी परतावा मिळवून देण्याची तसेच शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. प्रारंभी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी नगरपालिका ते महापालिकेपर्यंतचा इतिहास मांडत, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजीचे पालकत्व स्वीकारून जीएसटी परतावा व पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार राहुल आवाडे यांनी शहरासमोर अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी सभागृहात सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना आणि प्रलंबित प्रश्न सोडवताना विकासाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार धैर्यशील माने यांनी जनतेचे प्रश्न सोडवून मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले. इचलकरंजी महापालिका स्थापन होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोलाचे योगदान लाभले असून, त्यांच्या वाढदिवसादिवशीच महापालिकेच्या सभागृहाचे उद्घाटन, तसेच महापौर, विरोधी गटनेते आणि उपमहापौर यांचे वाढदिवस एकाच दिवशी येणे हा योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, गटनेते विठ्ठल चोपडे, रवींद्र माने, उदयसिंह पाटील, आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, विजय राजापुरे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभागृहाचे फीत कापुन उद्घाटन करताना ना.चंद्रकांत पाटील,खा.धैर्यशील माने,आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,मदन कारंडे,संजय तेलनाडे
कोनशिला अनावरण प्रसंगी ना.चंद्रकांत पाटील,खा.धैर्यशील माने,आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,मदन कारंडे,आयुक्त पल्लवी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800










