आपटे वाचन मंदिर मध्ये कथाकथन स्पर्धा संपन्न.
इचलकरंजी –
येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या वतीने कै. रामभाऊ आपटे पुण्यतिथी निमित्त इ. ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी इचलकरंजी शहर पातळीवर शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी कथाकथन स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये ४९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सर्वच स्पर्धक चांगल्या तयारीनिशी आले होते. स्पर्धेच्या प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत संस्थेच्या अध्यक्ष सुषमा दातार यांनी केले. कै. रामभाऊ आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. पाहुण्यांचा सत्कार ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. परीक्षकांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखिका व नाट्य अभ्यासिका जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. यावर्षीपासून दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस कार्यक्रमाच्या पाहुण्या कोल्हापूर येथील जेष्ठ लेखिका जयश्री दानवे यांनी त्यांचे वडील स्व. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. यावेळी त्यांनी एका कथेचे कथन केले व मुलांनी अवांतर वाचन केले पाहिजे असे सांगून मार्गदर्शन केले. प्रा. सुरेश कांबळे व मा. निशा दांडगे यांनी परीक्षक या नात्याने मनोगतातून मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन संस्थेचे सहकार्यवाह प्रा. डॉ . सुजित सौंदत्तीकर यांनी केले. यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्री. काशिनाथ जगदाळे, संचालिका माया कुलकर्णी, श्री. राजदर्शन दानवे, श्री. सुधीर पेटकर, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, पालक प्रचंड संख्येने उपस्थित होते. विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे. प्रथम क्रमांक- कु. तीर्था सचिन कुलकर्णी (सौ. गंगामाई विद्या मंदिर, इचलकरंजी), द्वितीय क्रमांक- चि. चैतन्य गणेश होगाडे (तात्यासाहेब मुसळे बाल विद्यामंदिर, इचलकरंजी), तृतीय क्रमांक- कु. ॲना अखिल नाईक (रवींद्रनाथ टागोर विद्या निकेतन ,शाळा क्र. २७,इचलकरंजी) , उत्तेजनार्थ -१) कु. यूधिरा रमेशचंद्र ओझा (आयडियल इंग्लिश स्कूल ,इचलकरंजी),२) कु. आदिती दिनेश रेंदाळकर (कै.. बाळकृष्ण सांगली विद्या मंदिर ,इचलकरंजी)
कथाकथन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ करताना पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







