महापौर व उपमहापौर दालने तळमजल्यावर स्थलांतरित करण्याबाबत नागरिक मंचचे निवेदन
इचलकरंजी :
इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महापौर, उपमहापौर तसेच विविध विषय समित्यांची दालने तळमजल्यावर किंवा किमान दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात यावीत, अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन महापौर उदय धातूंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांना देण्यात आले.
इचलकरंजी हे राज्यातील प्रमुख वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर असून येथे सुमारे चार लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. विविध नागरी, मूलभूत व प्रशासकीय प्रश्नांबाबत नागरिकांना वारंवार लोकप्रतिनिधींकडे निवेदन देण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात येावे लागते. मात्र सध्या महापौर, उपमहापौर व विषय समित्यांची दालने महानगरपालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे नागरिकांना तीन मजले चढावे लागतात.
विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच आजारी व्यक्तींना यामुळे मोठ्या प्रमाणात शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाया जात असून प्रशासनाविषयी अस्वस्थता निर्माण होत आहे.
नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने व सुकर प्रशासनाच्या हेतूने संबंधित दालने तळमजल्यावर अथवा किमान दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महापौर उदय धातूंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना इनामचे उमेश पाटील, राजू कोन्नूर, चंद्रकांत मांगलेकर, राम आडकी, जतीन पोतदार, महेंद्र जाधव, विनोद जाधव, नितीन ठिगळे, अमृत पारख, इम्तियाज मुल्ला, अमित बियाणी, राजु आरगे व अभिजित पटवा आदी उपस्थित होते.
महापौर उदय धातूंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांना निवेदन देताना इनामचे सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








