ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज’ विषयावर व्याख्यान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज’ विषयावर व्याख्यान

इचलकरंजी
 इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्था, भारताच्या अण्वस्त्र निर्मितीचा पाया आणि देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन देत भविष्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. त्यांनी घातलेल्या भक्कम पायावर आज कोविड लसीपासून यूपीआय तंत्रज्ञानापर्यंत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात जगाला स्तिमित करणारी झेप घेतली आहे. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने भारत आणि भारतीय आयटी क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना अग्रक्रम देत देशाने वाटचाल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक रणजीत यादव यांनी केले.
समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित साप्ताहिक चर्चासत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रमेश लवटे होते. देवदत्त कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यादव पुढे म्हणाले की, भविष्यात समर्थ भारत घडवायचा असेल तर आजची आव्हाने स्वीकारून पुढील चाळीस-पन्नास वर्षांनंतरही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकेल अशी तंत्रज्ञाननिर्मिती करावी लागेल. त्यासाठी सरकारने विज्ञान-तंत्रज्ञानावरील खर्च वाढवणे, संशोधनाला चालना देणे आणि तरुणांना प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे. मागील साठ-सत्तर वर्षांत देशात उभारलेल्या संस्थात्मक पायाभरणीच्या आधारे आजची वैज्ञानिक वाटचाल सुरू आहे. भूक व गरिबीचे प्रश्न विज्ञानाच्या माध्यमातून सोडवता येतील, असा आशावाद नेहरूंनी व्यक्त करत त्या दृष्टीने धोरणे आखली होती. आता पुढील साठ-सत्तर वर्षांचा विचार करून तशीच दीर्घकालीन वैज्ञानिक धोरणे राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रणजीत यादव यांनी विविध उदाहरणांच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता प्रभावीपणे मांडली. अध्यक्षीय समारोप प्रा. रमेश लवटे यांनी केला. शकील मुल्ला यांनी आभार मानले.
मार्गदर्शन करताना रणजित यादव व्यासपीठावर प्रा.रमेश लवटे सर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा