शारीरिक स्वास्थ्याबरोबर स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे – डॉ. संध्या ढवळे
इचलकरंजी
श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी इचलकरंजी येथील प्रख्यात डॉ. संध्या ढवळे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींशी शारीरिक व मानसिक आरोग्य यांविषयी हितगुज साधले. आपल्या वक्तव्यात त्यांनी सातत्य आणि शिस्त असल्यास आपणास व्यक्तिमत्व विकास उत्तमरीत्या साधता येतो हे सांगून नियमित व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थिनींकडून सहज सोप्या पद्धतीने करता येणाऱ्या व्यायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक करून घेतले. स्त्रियांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे असल्याचे सांगून विविध उदाहरणांद्वारे मानसिक आरोग्य जपण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमात समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी सृजनशीलता ही स्त्रीची ताकद आहे. मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीपासून स्त्री महत्त्वाची असल्याचे सांगून जेव्हा पुरुष अहंगंड सोडतील व स्त्रिया न्यूनगंड सोडतील तेव्हा स्त्री पुरुष समानता होईल, असे मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातून सन २०२५-२६ साठी कु. कोमल राजेंद्रप्रसाद राठी, बी.ए. भाग तीन हिला ” कन्या-सुकन्या ” सन्मानाने गौरविण्यात आले. आपल्या मनोगतातून तिने याविषयी आनंद व्यक्त करून आपल्या जडणघडणीतील महाविद्यालयाचे स्थान स्पष्ट केले व महाविद्यालयातील गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक व महिला कर्मचारी तसेच प्रा. श्री. दत्ता घाटगे यांचा सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिला सक्षमीकरणाची वाटचाल स्पष्ट केली. स्त्रियांना असलेली स्त्री-पुरुष समानतेची अपेक्षा व्यक्त करत स्त्री सुरक्षिततेची गरज सांगून स्त्री म्हणून सजग राहण्याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय जूनियर विभागप्रमुख श्रीमती सोनाली बोरगावकर यांनी करून दिला. डॉ. अनिता आंबोकर यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा. प्रिया सुतार व प्रा. निकिता बडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम महिला सबलीकरण विभाग, अँटी रॅगिंग कमिटी, लैंगिक छळ प्रतिबंध विभाग, अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. महाविद्यालयातील जूनियर व सीनियर विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
डॉ संध्या ढवळे यांचे स्वागत करताना प्रा.त्रिशला कदम,प्रसाद कुलकर्णी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






