इचलकरंजीत शस्त्रक्रिया शिबिरात २७१ शस्त्रक्रिया; उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉक्टरांचा सन्मान
इचलकरंजी :
माननीय आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून व इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब व इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ मार्च ते १४ मार्च या कालावधीत विशेष शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरामध्ये नेत्ररोग, अस्थिरोग तसेच कान-नाक-घसा विभागातील शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कालावधीत एकूण २०९ मोठ्या शस्त्रक्रिया आणि ६२ लहान शस्त्रक्रिया अशा एकूण २७१ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. नेत्ररोग विभागात डॉ. राहुल फासे, डॉ. रामेश्वरी व डॉ. मोघे यांनी सेवा दिली. अस्थिरोग विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ, डॉ. नांगरे व डॉ. दसरे यांनी शस्त्रक्रिया केल्या. तर कान-नाक-घसा विभागात डॉ. सरजे व डॉ. मित्रा यांनी कामकाज पाहिले. शिबिरादरम्यान भूलतज्ञ म्हणून डॉ. लवटे, डॉ. जाधव व डॉ. कुंभार यांनी सेवा बजावली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच रोटरी क्लबचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी समारोपानंतर कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केलेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ, डॉ. रामेश्वरी व डॉ. मोघे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या शिबिरासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील रुग्ण संदर्भित केले होते. प्रशासनाकडून शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसह त्यांच्या एका नातेवाईकाच्या जेवणाचीही सोय करण्यात आली होती. तसेच या शिबिरात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत एकूण २१ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







