इचलकरंजीत बुधवारी धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची मूक पदयात्रेने सांगता
इचलकरंजी:
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येत असलेल्या बलिदान मासाची सांगता बुधवार, १८ मार्च रोजी शहरातून मूक पदयात्रेने करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता मंगलधामजवळील गणपती मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून समारोप श्री शंभूतीर्थ येथे होणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन गुरुजी व कार्यवाह प्रसाद जाधव यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज यांनी देश व धर्मरक्षणासाठी दिलेल्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत बलिदान मास पाळला जातो. औरंगजेबाच्या कैदेतून ते त्यांच्या दुर्दैवी मृत्यूपर्यंतच्या कालखंडाचे स्मरण या निमित्ताने केले जाते.
इचलकरंजी शहरात गेल्या २१ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यंदा बलिदान मासानिमित्त शहरातील सुमारे ४०० चौकांमध्ये संभाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
बलिदान मासाच्या सांगतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मूक पदयात्रेत देश व धर्मरक्षणाची शपथ घेतली जाणार आहे. या पदयात्रेत धारकरी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




