ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत गॅस टंचाई, रेशन व पेन्शन प्रश्नांवर मार्क्सवादी पक्षाचा इशारा; १५ दिवसांत तोडगा न काढल्यास आंदोलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत गॅस टंचाई, रेशन व पेन्शन प्रश्नांवर मार्क्सवादी पक्षाचा इशारा; १५ दिवसांत तोडगा न काढल्यास आंदोलन

इचलकरंजी
 भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), इचलकरंजी शहर कमिटीच्या वतीने प्रांतधिकाऱ्यांना विविध नागरी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले असून, गॅस टंचाई, रेशन धान्य वितरण आणि पेन्शन प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या १५ दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यात सुमारे २० टक्के कपात झाली असून व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे शहरात गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. सिलेंडर मिळण्यासाठी २१ दिवसांऐवजी २५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी ऑनलाईन प्रणालीही बंद असल्याने नोंदणी होत नसून, या परिस्थितीचा गैरफायदा घेत गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांसह छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
तसेच, प्राधान्य कुटुंबांना रेशन धान्य मिळण्यासाठीचा इष्टांक संपल्याचे कारण देऊन अनेकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना व श्रावण बाळ पेन्शन योजनेअंतर्गत हजारो लाभार्थ्यांचे पेन्शन थकीत असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
पक्षाने केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: घरगुती गॅस पुरवठा पूर्ववत करावा, रेशनवर रॉकेल उपलब्ध करून द्यावे, गॅस काळाबाजारावर कठोर कारवाई करावी, छोट्या व्यावसायिकांना दर १५ दिवसांनी एक सिलेंडर द्यावा, प्राधान्य कुटुंबांसाठी धान्याचा इष्टांक वाढवावा, तसेच सर्व थकीत पेन्शन तात्काळ जमा करावी. यासोबतच प्राधान्य कुटुंबांसाठी उत्पन्न मर्यादा शहरी भागात वार्षिक ३ लाख रुपये व ग्रामीण भागात २ लाख रुपये करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ही सर्व मागण्या १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहर सेक्रेटरी कॉ. भरमा कांबळे यांनी दिला आहे. या निवेदनावर कॉ. भाऊसाहेब कसबे, कॉ. धनाजी जाधव, कॉ. सदा मलाबादे, कॉ. दत्ता माने, सौ. शोभा शिंदे, कॉ. नूरमहम्मद बेळकुडे, संजय टेके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संजय काटकर यांना निवेदन देताना माकप पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा