इचलकरंजीत शांतता समिती बैठक; ‘झिरो ड्रग’ मोहिमेतर्गत कारवाईला गती,गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा
इचलकरंजी :
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजी पोलीस ठाणे येथे आज शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवाजीराव गायकवाड, इचलकरंजी पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश चव्हाण तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन सुर्यवंशी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अमृत मामा भोसले यांनी नदीकिनारी शेतकऱ्यांना मद्यपान करून मारहाण करणाऱ्या प्रकारांकडे लक्ष वेधले. अहमद मुजावर यांनी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवावा, असे सांगत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जाफर मुजावर यांनी मोहल्ला कमिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. अभिजित पटवा यांनी वाढत्या नशेखोरीबाबत चिंता व्यक्त करत समूळ उच्चाटन करण्याची मागणी केली. सलीम शिकलगार यांनी जबरदस्तीच्या धर्म परिवर्तनाविरोधातील कायद्याची माहिती दिली. अत्तार सर यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना केली. प्रवीण सामंत यांनी पालकांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले, तर प्रदीप माळगे यांनी बेदरकार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी केली.आकाशा मुल्ला यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी जिल्हा पोलिस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशाने सुरू असलेल्या ‘झिरो ड्रग’ मोहिमेअंतर्गत नशेखोरांवर जोरदार कारवाई सुरू असून त्याचे समूळ उच्चाटन करण्यास पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून शहराच्या भल्यासाठी सर्वजण कार्यरत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नागरिकांनी गोपनीय माहिती पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या क्रमांकावर देण्याचे आवाहन केले.
बैठकीच्या शेवटी इचलकरंजी पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीस शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







