सांगली रिंग रोड पर्यायी रस्त्यावरून राजकारण; वाहनधारकांत संताप, आंदोलनाचा इशारा
इचलकरंजी :
शहरातील सांगली रोडला जोडणारा रिंग रोडचा पर्यायी रस्ता राजकारणात अडकला असल्याने वाहनधारकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कामाचे श्रेय घेण्याच्या वादात हा महत्त्वाचा प्रकल्प रखडल्याचा आरोप होत असून, नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
इचलकरंजीतील वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता सांगली रोडवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी रस्ता मंजूर करण्यात आला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतून सुमारे १ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारालाही कार्यादेश देण्यात आला.
मात्र, प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या प्रकल्पात श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेप आडवा आल्याची टीका होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
सांगली रोड परिसरात फॉर्च्यून प्लाझा, शाळा आणि विविध व्यावसायिक संकुलांमुळे कायम मोठी वाहतूक कोंडी होते. सध्या महासत्ता चौकात कृष्णा पाईपलाईनच्या कामामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. प्रस्तावित हरीश लाटणे प्लॉट ते रिंग रोड हा पर्यायी मार्ग वेळेत पूर्ण झाला असता, तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली असती, असे नागरिकांचे मत आहे.
दरम्यान, बुधवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ काम सुरू करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







