इचलकरंजी महापालिकेची आज सर्वसाधारण सभा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित,बायोमायनिंग विषयावर पडदा?
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज १२.१५ वाजता प्रशासकीय इमारतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत विविध प्रशासकीय, विकासकामे व नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मागील सभांचे इतिवृत्त कायम करणे, विशेष समित्यांचे अधिकार क्षेत्र निश्चित करणे, पदाधिकाऱ्यांचे मानधन व भत्ते मंजूर करणे, तसेच महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना वाहन उपलब्ध करून देण्याचे धोरण ठरविणे यांसारखे विषय सभेपुढे मांडले जाणार आहेत.
याशिवाय पंचगंगा नदीच्या संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजना, नदी प्रदूषण नियंत्रण व सायझिंग उद्योगातील स्लज व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या उपाययोजना यावरही चर्चा होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बेवारस वाहने हटविणे, जीर्ण सार्वजनिक शौचालयांची विल्हेवाट, तसेच बागा व ऑक्सिजन पार्क दत्तक तत्वावर देण्याबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहेत.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधकाम परवान्याच्या अटी शिथिल करण्याचा मुद्दा, महापौर निवासस्थानासाठी जागा निश्चित करणे, तसेच वाढीव हद्दीतील रस्ते, गटारे व पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे.
तसेच अग्निशमन विभागाची सद्यस्थिती, भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रण, भुयारी गटार योजनेची प्रगती, तसेच विविध विकास योजनांअंतर्गत झालेल्या कामांची माहिती सभेसमोर सादर केली जाणार आहे.
महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होण्याची शक्यता असल्याने या सभेकडे नगरसेवकांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
बायोमायनिंग विषयावर पडदा? विरोधकांची भूमिकेबाबत उत्सुकता
महापालिकेच्या पहिल्या सभेत बायोमायनिंग व बायोरेमीडिशन वर्क ऑर्डर वरून गोंधळ झाला होता त्यानंतरही प्रशासनाने काम नियमानुसार झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते,मात्र शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकानी मैल खड्ड्यावर जाऊन पाहणी करत अनेक त्रुटी उघडकीस आणल्या होत्या.सदर वर्कऑर्डर देताना पहिल्या टप्प्याची व दुसऱ्या टप्प्याची वर्क ऑर्डर एकत्रित दिली होती,तरीही दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी मक्तेदार का बदलला गेला त्यामध्ये कुणाचे हितसंबध जपले गेले याबाबात विरोधक काय भूमिका घेणार की विषयावर पडदा टाकणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









