फुले-आंबेडकर विचारधारा आजही समाजाला दिशा देणारी – देवदत्त कुंभार
इचलकरंजी :
समता, स्वातंत्र्य आणि जातीअंताचा विचार मांडत शोषणमुक्त समाज उभारण्यासाठी महात्मा फुले यांनी उभारलेली चळवळ आजही तितकीच प्रेरणादायी आहे. स्त्री, दलित व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग असल्याचे ठाम प्रतिपादन महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाविरोधात दोघांनीही कठोर भूमिका घेतली. नीती व सदाचार हे त्यांच्या धर्मचिंतनाचे केंद्र होते. व्यक्तीस्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा त्यांचा विचार आजच्या भोंदूशाहीवर प्रखर प्रहार करणारा आहे, असे मत तरुण शिक्षक व अभ्यासक देवदत्त कुंभार यांनी व्यक्त केले.
समाजवादी प्रबोधिनी आयोजित साप्ताहिक चर्चासत्रात “फुले-आंबेडकरांची विचारधारा” या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. महात्मा फुले यांचे द्विशतक जन्मवर्ष आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे १३५वे जयंती वर्ष यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नौशाद शेडबाळे होते. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
देवदत्त कुंभार पुढे म्हणाले, शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव मिळावा ही भूमिका मांडणारे महात्मा फुले हे दूरदृष्टीचे विचारवंत होते. ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथांमधून त्यांनी कष्टकरी शेतकरी व कामगार वर्गाच्या वेदना मांडल्या. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढे डॉ. आंबेडकरांच्या संविधान निर्मितीमध्येही मार्गदर्शक ठरला.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही समता व मानवतेच्या मूल्यांची स्थापना करणारी असून भविष्यातही संपूर्ण मानवजातीस दिशा देणारी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात नौशाद शेडबाळे यांनी फुले-आंबेडकर विचारांचे समाज, संस्कृती, शिक्षण, शेती व व्यवसाय या विविध क्षेत्रांतील आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी शशांक बावचकर, अशोक केसरकर, पांडुरंग पिसे, सचिन पाटोळे, रणजीत यादव, शकील मुल्ला, शहाजी धस्ते, रामभाऊ ठिकणे, मनोहर जोशी, अशोक माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अन्वर पटेल यांनी मानले.
मनोगत व्यक्त करताना देवदत्त कुंभार
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







