सुरेश भट यांनी लिहित्या पिढ्या निर्माण केल्या ,प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
इचलकरंजी:
मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती कविवर्य सुरेश भट कविते मधल्या ‘गझल’ या काव्यप्रकारासाठी जन्मभर झिजत राहिले. स्वतः लिहीत असतानाच शेकडो कवींना त्यांनी लिहिते केले .आपल्यामागे लिहित्या पिढ्या निर्माण करणारा ऐतिहासिक कवी एखादाच असतो. मराठी कवितेच्या इतिहासात सुरेश भट हा असा इतिहास पुरुष आहे .
‘जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा
,
घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची ” किंवा
“
मी साळसूद सुर्याशी केले न कधी तहनामे ,
मी लाख लाख लोकांच्या हृदयात प्रकाशत होतो “..
असा स्वतःच्या शब्दांवर आदम्य विश्वास असणाऱ्या सुरेश भटानी मराठी कवितेचे दालन विविध प्रकारानी समृद्ध केले, असे मत प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने सुरेश भट यांच्या ९४ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी वृत्तपत्र पत्रलेखक संजय भस्मे यांच्या हस्ते सुरेश भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या एप्रिल महिन्याच्या अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,“पुसतात जात मुदडे मसणात एकमेकांना ,कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला ? ” असा जातीयते विरोधी विदारक ,दाहक अनुभव मांडणारे सुरेश भट मानवी मनोव्यापारांचे चित्रण अतिशय प्रभावी पद्धतीने करत असत. त्यांच्याइतके प्रखर सामाजिक भान असलेला कवी फार विरळा असतो.कोणत्याही जातीय दंगलीत पक्षी मारले जात नाहीत, झाडे कापली जात नाहीत ,मारली व कापली जातात ती माणसे ‘असे म्हणणाऱ्या सुरेश भटांना मानवतेची जपणूक करणारी कविता अतिशय जवळची वाटत असे.किंबहुना तीच कविता त्यांनी लिहिली. यावेळी पांडुरंग पिसे ,सौदामिनी कुलकर्णी कविता डांगरे ,मानसी तगारे , अशोक माने, कुमार मिणचे , विक्रम निंबाळकर, सुंदर कांबळे ,अमोल पाटील ,कुमार पाटील ,श्रीकांत कटकोळे आदी उपस्थित होते.
सुरेश भट यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलताना प्रसाद कुलकर्णी व प्रबोधिनीचे सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






