फेरीवाल्यांच्या गैरहजेरीत गटारीवरील अतिक्रमण निर्मूलन; इचलकरंजीत अतिक्रमण मोहीम पार
इचलकरंजी:
शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जाहीर करण्यात आलेली मोहीम आज पार पडली. फेरीवाले मोठ्या प्रमाणात गैरहजर राहिल्याने मनपाने व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांवरच जेसीबीचा बडगा चालवत मोहीम राबवली.
महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांनी फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र सुमारे साडेआठशे फेरीवाले शहरात न आल्याने “अतिक्रमण काढायचे कोणाचे?” असा प्रश्न उपस्थित झाला होता.
दरम्यान, झेंडा चौक व कोर्ट परिसरातून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. रस्त्याकडेला गटारीबाहेर झालेली अतिक्रमणे, गटारीवरील बांधकामे तसेच पानटपऱ्यांची खोकी हटवण्यात आली. यशवंत प्रोसेस व सोन्या मारुती मंदिर परिसरात काही दुकानदारांनी केलेले पाच ते दहा फूट अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले.
कारवाईदरम्यान काही ठिकाणी वादावादी झाली असून सुमारे ९ ते १० लाखांचे नुकसान झाल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात आला. काहींनी नगरसेवकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, शुक्रवारी व मंगळवारी भरणारा आठवडा बाजार आणि रस्त्याकडील भाजी विक्रेते आज पूर्णपणे गायब होते. सुमारे ८५० हून अधिक फेरीवाल्यांनी मनपाला चकवा दिल्याची चर्चा रंगली. या मोहिमेत नगरसेवक व फेरीवाल्यांचे नेते अनुपस्थित राहिल्याने सामान्य कर्मचाऱ्यांनाच संपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागली.
अतिक्रमण निर्मूलन मोहीमेवेळीचे छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





