महापालिकेची सभा वादळी; सत्ताधारीच आक्रमक, विविध विषयांवर खडाजंगी
इचलकरंजी, ता. ३० :
इंदोर स्वच्छता पॅटर्न, गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर वाचनालय शुल्कवाढ, ई-बस प्रकल्पातील विलंब, होर्डिंग्ज परवानगी, उद्यान नामकरण, घनकचरा प्रक्रिया आदी मुद्द्यांवरून महापालिकेची सर्वसाधारण सभा तब्बल सात तास वादळी ठरली. विशेष म्हणजे विरोधकांपेक्षा सत्ताधारी नगरसेवकच अधिक आक्रमक दिसून आले. सत्ताधारी व विरोधकांमध्ये अनेकवेळा जोरदार खडाजंगी झाली. ३८ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उदय धातुंडे होते. उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे (कोल्हे) व नगरसचिव राहूल पोटे उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी विषय पत्रिकेवर आक्षेप घेत नियमभंगाचा मुद्दा उपस्थित केला.तर ऐनवेळी विषय बदलल्याच्या आरोपावरून गदारोळ झाला. सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी पुढे दक्षता घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाद शांत झाला.
पाणीप्रश्नावर चर्चा न झाल्याने संतप्त नगरसेवक रणजीत जाधव यांनी सभात्याग केला. ७ मे रोजी विशेष सभा घेण्याची घोषणा महापौरांनी केली.
इंदूर पॅटर्नवर नगरसेवक रवी रजपूते आक्रमक झाले मक्तेदार हे नगरसेवकांचे समर्थक आहेत असे सांगून त्यांनी नगरसेवकांचा हस्तक्षेप कमी करण्याची मागणी केली.तर गुरुवर्य टागोर वाचनालय शुल्कवाढीवर मतदान घेऊन ५०० ऐवजी ३०० रुपयांची वाढ ३५ विरुद्ध १४ मतांनी मंजूर झाली. ई-बस प्रकल्पातील विलंब, मंजुरीशिवाय रस्त्याचे काम, कचरा संकलन ठेकेदाराचे अपयश, घनकचरा प्रक्रिया ठेका रद्द करणे या विषयांवर गदारोळ झाला. एनडीके कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेत कामगारांचे देय वसूल करण्याचे ठरले.
होर्डिंग्ज परवानगीचा विषय विरोधामुळे प्रलंबित ठेवण्यात आला. बायोमायनिंग विषय न घेतल्याने संजय तेलनाडे आक्रमक झाले मात्र महापौराणी चर्चेअभावी विषय गुंडाळला. कूपनलिका विषयावर माहितीअभावी विरोधकांनी वेलमध्ये ठिय्या मारला. तानाजी पोवार यांनी ई-बस मूलभूत सुविधांवर जोर दिला, तर सभापती अरुणा बचाटे यांनी कामकाजावर नाराजी व्यक्त केली. वृक्ष समिती गठित करण्याचे अधिकार महापौरांना देण्यात आले असून काही जुन्या इमारती पाडण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.गटनेते विठ्ठल चोपडे,राजु बोंद्रे,नितेश पोवार,अमरजीत जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला.
चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधक
रणजित जाधव यांचा पाणीप्रश्नी सभात्याग
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







