इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यावर लवकरच निर्णय; निधीची कमतरता भासू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठ्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत इचलकरंजी शहराच्या वाढत्या पाणी गरजा, कृष्णा नदीवरील उपलब्ध जलस्रोत आणि परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, इचलकरंजीचे महापौर उदय धातूंडे, उपमहापौर अनिल डाळ्या तसेच जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान इचलकरंजीच्या वाढत्या लोकसंख्येनुसार भविष्यातील पाणी गरजा आणि उपलब्ध पर्यायांबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृष्णा नदी ही तीन राज्यांसाठी महत्त्वाचा जलस्रोत असल्याचे नमूद करत कोणत्याही राज्याचे नुकसान न करता संबंधित भागाला आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले.
इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे विविध पर्याय तपासण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या अभ्यासानंतर तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेऊन शासन अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक असल्यास बिनव्याजी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाईल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर वसुली अधिक प्रभावी करण्याबरोबरच बांधकाम क्षेत्रातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
योजनेचे सादरीकरण करताना आ.राहुल आवाडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








