ICHMH51NEWS.IN
9921600800

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्‍याची जय्यत तयारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्‍याची जय्यत तयारी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

इचलकरंजी/प्रतिनिधी –
देशाचे केंद्रीय गृह तथा सहकारी मंत्री अमित शाह हे शनिवार 20 जून रोजी इचलकरंजी दौर्‍यावर येत आहेत. येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन तसेच जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार समारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर केएटीपी मैदान येथे त्यांच्या उपस्थितीत महायुतीची जाहीर सभा होणार असून त्याची सर्व जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली. या दौर्‍याच्या निमित्ताने शहरात जयत तयारी सुरू असून विविध पातळीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
येथील स्टेशन रोडवरील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन तसेच हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना’ असा नामविस्तार सोहळा या कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नामदार शाह हे शनिवारी इचलकरंजीत येत आहेत. बँकेच्या कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत सहकार साखर परिषद आणि सहकार भारती संस्थेचे अधिवेशन ही पार पडणार आहे. त्यानंतर केएटीपी मैदान याठिकाणी महायुतीची सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभाण्यात आले असून सुमारे 20 हजारपेक्षा अधिक बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाची जय्यती तयारी करण्यात आली असून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे यांनी अधिकार्‍यांसोबत पाहणी करुन आवश्यक त्या सूचना केल्या.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार चंद्रकांतदादा पाटील,हसन मुश्रीफ, जयकुमार गोरे, संजय सावकारे, शिवेंद्रराजे भोसले, बाबासाहेब पाटील, आशिष शेलार, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धनंजय महाडीक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री शिवाजीराव पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षिरसागर, विनय कोरे,अशोकराव माने, अमल महाडीक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, सुधीर गाडगीळ, सौ. शशीकला आण्णासोा जोल्ले, निरंजन डावखरे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, तसेच व्हीव्हीआयपी सुरक्षेला बाधा येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक आराखडा जाहीर केला आहे. शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तब्बल ५५० पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा