अल्पवयीन मुली प्रकरणी निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची विश्व हिंदू परिषदेची मागणी
इचलकरंजी, दि. २७ :
विश्व हिंदू परिषद, इचलकरंजीच्या वतीने आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन समीर मणेर व साहिल मणेर यांच्याविरुद्ध समोर आलेल्या आरोपांची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात कथितपणे हिंदू धार्मिक ओळख सांगून अल्पवयीन मुलींशी संपर्क साधणे, त्यांचा विश्वास संपादन करून फसविण्याचा प्रयत्न करणे तसेच छेडछाडीचे आरोप समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीडित मुली अल्पवयीन असल्याने संबंधित आरोपींचे मोबाईल, सोशल मीडिया खाती, चॅट, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर डिजिटल व भौतिक पुराव्यांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.
तपासादरम्यान समोर येणारे तथ्य व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पॉक्सो कायदा, भारतीय न्याय संहिता २०२३, माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच आरोपींना त्यांच्या कुटुंबीयांकडून अथवा इतर कोणाकडून मदत, सहकार्य, आश्रय किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याचीही चौकशी करून संबंधितांवर आवश्यक कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेकडून मांडण्यात आली.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जलदगतीने करून पीडित अल्पवयीन मुलींना न्याय मिळावा तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कृष्णात गोंदूकुप्पे, रावसाहेब चौगुले, मुकेश डायमा, उमेश सगवकर, अनिकेत रोकडे, गणेश कांडेकर, श्रीकांत गावडे, राजू सवाईराम, सौ. अर्चना रानडे, सौ.गायत्री कांदेकर, अमोल शिरगुप्पे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पो.निरीक्षक शरद मेमाणे यांना निवेदन देताना विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







