रोटरी युवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न:
इचलकरंजी :
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी अॅनस इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला रोटरी युवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवतींचा युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योगपती निकुंज बगडिया यांच्या हस्ते तसेच रोटरीचे उपप्रांतपाल सुदर्शन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी लेफ्टनंट शार्दुल प्रकाश मोरबाळे (इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर निवड), वृंदा बालाप्रसाद भुतडा (योगासन विश्वकप २०२६ मध्ये सुवर्णपदक), निवेश नितेश पाटील (योगासन विश्वकप २०२६ मध्ये दोन सुवर्णपदके), पवन भाऊ साखरे (उत्कृष्ट दुग्धजन्य पदार्थ उत्पादक), वैष्णवी महेश बडे (हाऊस ऑफ कुडी या नावाने गारमेंट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी) तसेच प्रतीक प्रकाश साठे (फिल्म व मीडिया प्रोडक्शन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य) यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी निकुंज बगडिया आणि सुदर्शन कदम यांनी उपस्थित युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. गौरवमूर्तींनी आपल्या यशप्रवासातील संघर्ष, जिद्द आणि अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिडक यांनी स्वागत व मनोगत व्यक्त केले. प्रोजेक्ट चेअरमन सुहास पाटील यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख सुभाष तंगडी यांनी करून दिली, तर रोटरी अॅनसच्या मेघा येळरूटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी तंगडी यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे सेक्रेटरी राजू पाटील तसेच रोटरी अॅनसच्या अर्चना दबडे उपस्थित होत्या.
रोटरी श्रीमती सोनीदेवी रामविलास बाहेती सेवा केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महेंद्र मुथा, नेमिनाथ कोथळे, वसंत पाटील, अभय येळरूटे, अजित कुरडे, पंकज कोठारी, महादेव खारगे, शिवदास कित्तुरे, मुकुंद माळी, उत्तम रुग्गे यांच्यासह रोटरी क्लब व रोटरी अॅनसचे सदस्य, गौरवमूर्तींचे कुटुंबीय आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी युवा गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचा क्षण
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







