कन्या महाविद्यालयात प्रो. डॉ. त्रिशला कदम यांचा सेवासाफल्य कार्यक्रम उत्साहात संपन्न.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये ३८ वर्षांची प्रदीर्घ सेवा
इचलकरंजी :
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या माजी प्रभारी प्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. त्रिशला कदम या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त आयोजित सेवासाफल्य कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रुती जोशी उपस्थित होत्या.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये तब्बल ३८ वर्षे सेवा बजावल्यानंतर प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी आपल्या कार्यकाळाचा समारोप केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळातील अनुभवांना उजाळा देत संस्था, सहकारी आणि मार्गदर्शकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या भाषणात त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे, कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, माजी प्राचार्य डॉ. शैलजा साळुंखे, कै. शुभांगीताई गावडे, डॉ. श्रुती जोशी तसेच संपूर्ण साळुंखे परिवार आणि संस्था परिवाराचे ऋण व्यक्त केले. “आज आपण जे काही आहोत ते संस्थेमुळेच आहोत. समाजाला दिशा देणाऱ्या महामानवांसह माझी संस्था आणि माझे महाविद्यालय यांना माझ्या आयुष्यात विशेष स्थान आहे. हे ऋणानुबंध पुढेही जपण्याचा प्रयत्न करेन. आगामी काळातही शैक्षणिक, सामाजिक आणि संस्थेच्या कार्यासाठी माझ्याकडून शक्य ती मदत करत राहीन,” असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. श्रुती जोशी यांनी प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, संस्थेसाठी आयुष्याचा महत्त्वाचा कालावधी समर्पित करणाऱ्या गुरुदेव कार्यकर्त्या म्हणून प्रो. कदम यांची ओळख कायम राहील. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्त्यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रो. डॉ. त्रिशला कदम असून त्यांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदान कायम स्मरणात राहील.
कार्यक्रमात विद्यार्थिनी व प्राध्यापकांनीही आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संगीता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. स्वाती हाळवणकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. अनिता आंबोकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रो त्रिशला कदम यांचा सन्मान करताना प्राचार्य डॉ.श्रुती जोशी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







