भारत टेक्स २०२६ मध्ये इचलकरंजीची भव्य झेप; २६ स्टॉलद्वारे जागतिक बाजारपेठेत दमदार उपस्थिती
इचलकरंजी :
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे १४ ते १७ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भारत टेक्स २०२६ या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शनात इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISFMA) च्या माध्यमातून इचलकरंजीतील २६ वस्त्रोद्योग कंपन्या सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी अनिल गोयल, धवल देसाई, विजय पुरोहित, गोरखनाथ सावंत आणि अतुल बावणे उपस्थित होते.
यंदाच्या प्रदर्शनात इचलकरंजीला सुमारे १,००० चौरस मीटर जागेत २६ स्टॉल उभारण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये इचलकरंजीच्या उद्योगांनी ४२५ चौरस मीटर जागेत २० स्टॉल उभारले होते. एका वर्षात स्टॉलची संख्या आणि प्रदर्शनासाठी मिळालेल्या जागेत झालेली मोठी वाढ ही इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाची वाढती विश्वासार्हता आणि जागतिक स्तरावरील ओळख अधोरेखित करणारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील वर्षी भारत टेक्स प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इचलकरंजी पॅव्हेलियनला भेट दिल्यामुळे देश-विदेशातील उद्योगक्षेत्राचे लक्ष इचलकरंजीकडे वेधले गेले. त्यानंतर अनेक नवीन ग्राहक मिळाले तसेच निर्यातीसाठी व्यावसायिक संधी वाढल्याचा अनुभव उद्योगांनी व्यक्त केला.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या भेटीनंतर इचलकरंजीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पुढील सहा महिन्यांत इचलकरंजीत अत्याधुनिक टेक्सटाईल लॅब सुरू होणार असून, वस्त्रोद्योगातील गुणवत्ता तपासणी स्थानिक पातळीवरच होणार आहे. त्यामुळे उद्योगांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार असून निर्यात प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.
याशिवाय, एमआयडीसी स्थापनेसाठी आवश्यक असलेली १,००० एकर जागेची अट कमी करून १०० एकर करण्यात आल्याने इचलकरंजीपासून २५ किलोमीटर परिसरात ५ ते ६ नवीन एमआयडीसी विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नवीन उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
इचलकरंजीचा वस्त्रोद्योग केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपला ठसा उमटवत आहे. निर्यातीसाठी महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या बांगलादेशातील ढाका येथेही इचलकरंजीच्या उद्योगांनी ८ स्टॉल उभारून आपल्या उत्पादनांचे सादरीकरण केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
भारत टेक्स २०२६ मधील सहभागामुळे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाला नवीन ग्राहक, निर्यातीच्या अधिक संधी आणि जागतिक स्तरावर ‘ब्रँड इचलकरंजी’ अधिक बळकट करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






