हद्दपार आरोपी कोयत्यासह ताब्यात; शहापूर पोलिसांची कारवाई
इचलकरंजी, दि. १४ : कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला धारदार कोयत्यासह फिरताना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय ३२, रा. लिगाडेमळा, इचलकरंजी) याला उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी यांनी २४ जून २०२६ रोजीच्या आदेशान्वये दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, मंगळवारी (१४ जुलै) दुपारी ३.०५ वाजण्याच्या सुमारास तो जवाहरनगर येथील डेक्कन भाजीमंडई परिसरातील मोमीन चिकन सेंटरसमोर उघड्यावर धारदार कोयता बाळगून फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील सुमारे ३३ सेंमी पाते असलेला कोयता जप्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





