प्रभाग समिती सदस्यांची तात्काळ नियुक्ती करा; महासभेच्या अजेंड्यावर विषय घ्या : विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या चारही झोनमधील प्रभाग समित्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील तरतुदीनुसार सामाजिक, शैक्षणिक, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ आणि जनहितासाठी कार्य करणाऱ्या पात्र व्यक्तींची तात्काळ नियुक्ती करावी. तसेच हा विषय येणाऱ्या महासभेच्या अजेंड्यावर प्राधान्याने घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी महापौर उदय धातूंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर झोन अ, ब, क आणि ड अशा चार प्रशासकीय झोनची रचना करण्यात आली असून प्रभाग समिती अध्यक्षांची नियुक्ती झाली आहे. मात्र, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 29-अ नुसार विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, महिला प्रतिनिधी आणि जनहितासाठी कार्य करणाऱ्या नागरिकांचा समित्यांमध्ये समावेश करण्याची तरतूद असतानाही आजपर्यंत या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रभाग समित्या अपूर्ण असून नागरिकांचा प्रशासनातील सहभाग मर्यादित राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रभाग समित्यांमध्ये विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा सहभाग झाल्यास स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पर्यावरण आणि नागरी सुविधांबाबत अधिक प्रभावी चर्चा होऊन प्रशासनाला विधायक सूचना मिळतील, असेही पाटील यांनी सांगितले.
निवेदनात चारही झोनमधील सदस्य नियुक्तीचा विषय महासभेच्या अजेंड्यावर घेणे, पात्र व्यक्तींची पारदर्शक पद्धतीने नियुक्ती करणे, नियुक्ती रखडण्याची कारणे महासभेसमोर मांडणे आणि निश्चित कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी नगरसेवक सचिन राणे व रतन वाझे उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





