आजच्या सर्वांगीण अध:पतनाच्या काळात प्रा. एन. डी. पाटील यांचा प्रबोधन विचार महत्त्वाचा-प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
इचलकरंजी ता.१५ राजकारण, समाजकारण, सहकार , शिक्षण,प्रबोधन अशा सर्व क्षेत्रांमध्ये सात दशकाहून अधिक काळ कार्यरत राहिलेल्या ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखे आहे.शेतकरी,कष्टकरी, कामगार, सर्वहारा, वंचित वर्गासाठी त्यांनी सतत लढे उभारले आणि ते यशस्वी केले.या लढ्यांना उपयुक्त ठरणारे लोकप्रबोधन एन.डी.पाटील सतत करत राहिले. त्यांचा तो विचार आजच्या सर्वांगीण अध:पतनाच्या अस्वस्थ वर्तमानात संघटितपणे अधिक गतीने पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले .ते समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्यावतीने समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा. डॉ.एन. डी. पाटील यांच्या ९७ व्या स्मृतिदिनी आदरांजली वाहताना बोलत होते. प्रारंभी तुकाराम अपराध आणि रामदास कोळी यांच्या हस्ते प्रा.डॉ.एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा. रमेश लवटे, पांडुरंग पिसे, सौदामिनी कुलकर्णी ,हरीश धोंडे, भरत चौगुले ,महेश दाते, अर्जुन वाडे, रमेश चेट्टी, पांडुरंग आगम , शरद जाधव, उत्तम शिंत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, एन.डी.पाटील कालवश होऊन साडेचार वर्षे झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर, समाजकारणावर, चळवळींवर नैतिक धाक उरलेला नाही. आपल्या बुलंद लढाऊ नैतिक व्यक्तिमत्त्वाची निर्मिती प्रा.एन.डी. पाटील यांनी अतिशय निष्ठापूर्वक केलेली होती.छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी , महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या सर्वसामान्यांची बांधिलकी असलेल्या महामानवांच्या कार्य कर्तृत्वाचा लसावी काढून प्रा. एन. डी.पाटील स्वतःला घडवत गेले आणि तो विचार प्रबोधनातून समाजात रुजवत गेले. प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाच्या अनेक पैलूंचे विवेचन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





