प्रभाग ६ मधील सफाई कर्मचाऱ्यांना सुनील महाजन व विजया महाजन यांच्याकडून प्रत्येकी ₹५ हजारांची आगाऊ मदत; स्वच्छता कायम ठेवण्यासाठी पुढाकार
इचलकरंजी : प्रभाग क्रमांक ६ मधील सफाई कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यांनी १४ जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे प्रभागात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.
ही बाब लक्षात घेऊन प्रभागातील नगरसेविका सौ. विजया सुनील महाजन, माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन आणि विनय महाजन यांनी आज आपल्या निवासस्थानी सर्व सफाई कर्मचाऱ्यांची बैठक घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी तातडीचा पर्याय म्हणून प्रभागातील स्वच्छता अबाधित राहावी, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवू नये, या उद्देशाने सुनील महाजन आणि विजया महाजन यांनी प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याला वैयक्तिक स्वरूपात ₹५,००० आगाऊ देण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी बोलताना सुनील महाजन म्हणाले, “माझ्यासाठी सर्वप्रथम प्रभाग स्वच्छ आणि निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करणे हेही आमचे कर्तव्य आहे. काम बंद राहिल्यास कर्मचाऱ्यांचेही आर्थिक नुकसान होते. त्यामुळे हा तातडीचा निर्णय घेतला आहे.”
नगरसेविका सौ. विजया सुनील महाजन यांनीही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन देत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
सुनील महाजन यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आणि प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





