डॉ. दिनेश गिरधर बारी यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे “उत्कृष्ट सेवा पदक”
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश गिरधर बारी यांना पोलीस दलातील 21 वर्षांच्या निष्कलंक व उल्लेखनीय सेवेसाठी भारत सरकार, गृह मंत्रालय यांच्यावतीने “उत्कृष्ट सेवा पदक” प्रदान करण्यात आले आहे.
डॉ. दिनेश गिरधर बारी यांनी दि. 24 मे 2005 रोजी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवेत प्रवेश केला. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी नक्षल प्रभावित भाग (गोंदिया ), छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, राज्य राखीव पोलीस दल, कोल्हापूर, गुन्हे अन्वेषण विभाग, फोर्स वन इत्यादी घटकामध्ये आपले प्रभावी नेतृत्वातून कायदा व सुव्यवस्था यासह विविध जबाबदाऱ्या अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडत पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोलाची भर घातली आहे.
नोव्हेंबर 2023 ते जून 2026 या कालावधी दरम्यान नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र (UCTC), Force One, मुंबई येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना प्रशिक्षण क्षेत्रात त्यांनी कमांडो प्रशिक्षण, दहशतवादविरोधी प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, टॅक्टिकल प्रशिक्षण तसेच विविध केंद्रीय सशस्त्र दलांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या कार्यकाळात 15 व्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाने उल्लेखनीय कामगिरी करत पाच स्पर्धाप्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला, व स्पर्धेतील सर्वसाधारण विजेते पद मिळवले. तसेच AIPDM मधील त्यांच्या नेतृत्वाखालील संघाने राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण व कांस्य पदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचा गौरव वाढविला.
डॉ. बारी यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी यापूर्वीही त्यांना नक्षलग्रस्त भागातील विशेष सेवा पदक (2011), अंतर्गत सुरक्षा विभाग सेवा पदक (2014), Force One विशेष सेवा पदक (2015), महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह (2022), DGP, CRPF यांच्याकडून Commendation Badge तसेच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीकडून Tac Badge अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
प्रशिक्षण क्षेत्रातील त्यांचे ज्ञान, शिस्त, नेतृत्वगुण आणि प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील तसेच इतर राज्य पोलीस व केंद्रीय सशस्त्र दलातील अनेक अधिकारी व अंमलदारांच्या प्रशिक्षणात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशंसा केली असून, त्यांचे योगदान विशेषतः नागरी दहशतवादविरोधी प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय ठरले आहे.
सलग 21 वर्षांच्या निष्कलंक सेवेला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानाची बाब असून, डॉ. दिनेश गिरधर बारी यांच्या कर्तव्यनिष्ठ, समर्पित आणि उत्कृष्ट सेवेला मिळालेली ही यथोचित पावती आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








