आण्णारामगोंडा शाळेसमोरील जुने भाजी मार्केट पाडून अत्याधुनिक मार्केट उभारणार – उपमहापौर अनिल डाळ्या
इचलकरंजी : आण्णारामगोंडा शाळेसमोरील सुमारे ४५ ते ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले जुने भाजी मार्केट पाडून त्या ठिकाणी सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अद्ययावत भाजी मार्केट उभारण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजी महानगरपालिकेचे उपमहापौर अनिल डाळ्या यांनी दिली.
आण्णारामगोंडा शाळेसमोरील विद्यमान भाजी मार्केटची इमारत अत्यंत जुनी झाली असून तिचे बांधकाम जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहे. पावसाळ्यात छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन मार्केटमध्ये पाणी साचते. तसेच हवा खेळती न राहणे आणि अस्वच्छतेमुळे भाजी विक्रेते तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून ११ जून २०२६ रोजी करून घेण्यात आले आहे. तसेच नवीन भाजी मार्केटच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे उपमहापौर डाळ्या यांनी सांगितले.
इचलकरंजी शहराची वाढती लोकसंख्या तसेच भाजी विक्रेत्यांची वाढती संख्या लक्षात घेता, या ठिकाणी हायटेक व अद्ययावत भाजी मार्केट उभारण्यात येणार आहे. यामध्ये गाळ्यांसह स्वच्छता, पाणी, वीज, वायुवीजन, पार्किंग आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या प्रस्तावित मार्केटची उपमहापौर अनिल डाळ्या, महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील तसेच नगरसेवक नितेश पोवार, सुरेखा जाधव आणि स्नेहल रावळ यांनी पाहणी केली. मार्केट गोव्याच्या धर्तीवर आधुनिक पद्धतीने विकसित करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
उपमहापौर अनिल डाळ्या म्हणाले, “माझ्या कार्यकाळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार राहुल आवाडे, ज्येष्ठ नेते सुरेशराव हाळवणकर आणि माजी मंत्री प्रकाशराव आवाडे यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यात येईल. नागरिक आणि भाजी विक्रेत्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणारे आधुनिक भाजी मार्केट उभारून ते इचलकरंजी शहरातील जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.”
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







