गणेशोत्सवापूर्वी इचलकरंजीतील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक पॅचवर्कचा प्रयोग
इचलकरंजी : विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे जलद व टिकाऊ पद्धतीने बुजविण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पॅचवर्कचा प्रयोग सुरू केला आहे. गुरुवारी गावभागातील जुना फडणीस हौद चौकात दाब संवेदनशील साहित्याच्या वापरातून करण्यात येणाऱ्या या पॅचवर्कचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व आयुक्त पल्लवी पाटील यांनी प्रात्यक्षिकाची पाहणी केली.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी ही आधुनिक पद्धत वापरण्यात येणार आहे. इन्स्टा रोड पॅचरच्या सहाय्याने एका खड्ड्याचे पॅचवर्क अवघ्या दहा मिनिटांत पूर्ण होऊ शकते. यासाठी ट्रक, डंपर किंवा मोठ्या रोलरसारख्या अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता नसून कमी मनुष्यबळात काम करून रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करता येतो.
पारंपरिक पद्धतीने केलेल्या दुरुस्तीनंतर पुन्हा खड्डे पडण्याच्या तक्रारी होत असल्याने हे तंत्रज्ञान अधिक टिकाऊ ठरण्याची अपेक्षा आहे. गणेश चतुर्दशीपूर्वी प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवून ‘खड्डेमुक्त इचलकरंजी’ करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






