सक्तीच्या ऑनलाइन नोंदणीला यंत्रमागधारकांचा विरोध-विनय महाजन
‘ऑल महाराष्ट्र पॉवरलूम फेडरेशन’ची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय
भिवंडी :
वीज अनुदान सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून सक्तीची करण्यात येत असलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला राज्यातील प्रमुख यंत्रमाग उद्योग केंद्रांतील यंत्रमागधारक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करण्याचा निर्णय भिवंडी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जागृती यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली.
भिवंडी येथील सिलको हाऊस येथे भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, धुळे, सोलापूर, विटा आदी प्रमुख यंत्रमाग उद्योग केंद्रांतील यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची व्यापक बैठक पार पडली. बैठकीत साध्या यंत्रमाग उद्योगासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वीज अनुदान सुरू ठेवण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची करण्यात आली असली तरी या प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. इचलकरंजीतील मोजक्याच यंत्रमागधारकांनी नोंदणीचा प्रयत्न केला असून त्यांचीही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, धुळे, सोलापूर व विटा येथील एक टक्काही यंत्रमागधारकांनी नोंदणी केलेली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यंत्रमागधारकांना ऑनलाइन नोंदणीसाठी त्रास देण्याऐवजी वीजबिलावरील ग्राहक क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती राज्य सरकारने उपलब्ध करून घ्यावी, हा सोपा व व्यवहार्य मार्ग असल्याचे प्रतिनिधींनी नमूद केले.
दरम्यान, राज्यातील यंत्रमागधारकांना एकत्रित व्यासपीठ मिळावे यासाठी बैठकीत ‘ऑल महाराष्ट्र पॉवरलूम फेडरेशन’ची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन वस्त्रोद्योगाच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
भिवंडीतील बैठकीवेळी विनय महाजन व सूरज दुबे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






