खाजगी प्राथमिक शाळांना मिळणारी अपुरी पाठ्यपुस्तके व प्राथमिक शिक्षकांना उत्सव काळात दिली जाणारी अशैक्षणिक कामे याबाबत उपायुक्तांना निवेदन
इचलकरंजी :
समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तके अनेक खाजगी प्राथमिक शाळांना 100 % मिळालेली नाहीत तर साधारणपणे आवश्यक संख्येच्या 30 % च पुस्तके मिळाली आहेत.
याबाबत सदर संघटनेने निवेदन देऊनही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सप्टेंबर महिना उजाडला तरीही अजून अवश्यक ती पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्यामध्ये शाळेबद्दल गैरसमज निर्माण होऊन त्याचा परिणाम पटसंखेवर होत आहे. तरी सर्व खाजगी प्राथमिक शाळांना आवश्यक तितकी सर्व पुस्तके सत्वर मिळावीत असे निवेदन इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील मॅडम व इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री इरफान पटेल यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.
त्याचबरोबर विविध उत्सवांच्या काळात प्राथमिक शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे दिली जातात. महाराष्ट्र शासनाच्या 23 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अशा सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मुक्तता केलेली आहे. याला अनुसरून खाजगी प्राथमिक शिक्षकांना अशा प्रकारची कोणतीही कामे देऊ नयेत असेही निवेदन उपायुक्त व प्रशासनाधिकारी यांना देण्यात आले. हे निवेदन इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष श्री शेखर शहा यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठाचे पदाधिकारी मुख्याध्यापक श्री अशोक हुबळे, मुख्याध्यापक इरफान अन्सारी, मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर, तसेच संजय परीट, अशोक निंबाळकर, बाळासाहेब कोळी, संजय देमाण्णा, किरण दिवटे, प्रशांत गुरव, सचिन वारे, शितल खानाज, सागर शेंडे, बी. एस. पाटील, प्रदीप पाटील, किरण कोळी, आनंदा कांबळे, समता परदेशी, छाया गवळी, संतोष कारंडे इ. मुख्याध्यापक, संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800