चंदूरातील पूरग्रस्त यादीत गोंधळ,अप्पर तहसील कार्यालयात निवेदन.
इचलकरंजी : चंदूर (ता.हातकणंगले) येथील पूरग्रस्त सर्व्हेमध्ये गलथान कारभार झाल्याने प्रत्यक्षात घरांमध्ये पाणी आलेल्यांना सानुग्रह अनुदान न मिळता पाणी न आलेल्यांचा अनुदान यादीत समावेश करण्यात आला आहे. शासकीय अधिकाºयांकडून झालेल्या या चुकीच्या सर्व्हेबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी.तसेच खऱ्या पूरग्रस्तांना लाभ द्यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत व पूरग्रस्तांनी अप्पर तहसीलदार कार्यालयात दिले.
दरम्यान, अप्पर तहसीलदार कार्यालयीन कामकाजासाठी कोल्हापूरला गेल्याने पूरग्रस्तांनी तीन तास कार्यालयाबाहेर ठिय्या मारला. अखेर वेळ लागणार असल्याने अव्वल कारकूनांकडे निवेदन दिले.
निवेदनात, चंदूर येथे सन २०२४ मध्ये आलेल्या महापुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. त्यामुळे हे कुटुंबीय विस्थापित झाले. पूर पातळी वाढत असताना वेळोवेळी घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असणाºया कुटुंबीयांना प्रशासनाने नोटीसा देऊन स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या होत्या. पूर ओसरल्यानंतर त्या यादीप्रमाणे पंचनामेही करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सानुग्रह अनुदान देताना पाणी घरात आलेल्या अनेक कुटुंबांना वगळून पाणी न आलेल्या कुटुंबीयांचा समावेश या यादीत करण्यात आला. पूरग्रस्त यादी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तलाठी कार्यालयाकडे धाव घेत तक्रारी केल्या. अखेर सरपंच स्नेहल कांबळे, गटप्रमुख तथा हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांनी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. शिष्टमंडळात माजी उपसरपंच संदीप कांबळे, संजय जिंदे, आरपीआयचे अध्यक्ष कुमार कांबळे, सुधाकर कदम, बिरजू पुजारी, आदींसह ग्रामपंचायतीचे सदस्य व पूरग्रस्तांचा समावेश होता.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800