गणेशोत्सव २०२४ अंतर्गत पर्यावरणपूरक घरगुती श्रीगणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका यंत्रणा सुसज्ज -आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे
इचलकरंजी
इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सव यावर्षी पर्यावरण पुरक आणि भक्तीभावाने
मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या अनुषंगाने गुरुवार दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी शहरातील घरगुती श्रीगणेश मुर्ती विसर्जन होणार आहे. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी नियुक्त केलेल्या सर्व नियंत्रण व समन्वय अधिकारी कर्मचारी तसेच याकामी महानगरपालिका प्रशासनास नेहमीच सहकार्य करणाऱ्या सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समवेत श्रीगणेश विसर्जन उत्साही आणि आनंदी वातावरणात व्हावे या कामाच्या नियोजना करिता महानगरपालिका प्रशासनाची महत्वपुर्ण बैठक नाट्यगृहात आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच
उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सदर बैठकीत सर्व अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक त्या सुचना करणेत येऊन विसर्जन सोहळ्यासाठी महानगरपालिका प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवणेत आलेली आहे.याच अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी शहापूर खण येथे भेट देऊन पाहणी केली आणि गणेश मूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना सर्व विभाग प्रमुख यांना दिल्या.
यावर्षी श्रीगणेश मूर्ती विसर्जन शहापूर खणीसह शहरातील विविध ७१ ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने ठेवणेत येणाऱ्या कृत्रिम विसर्जन कुंडात करणेचे नियोजन करणेत आलेले आहे. शहापुर खण येथील विसर्जन स्थळी तसेच गणेश मूर्ती कृत्रिम विसर्जन कुंड तसेच निर्माल्य कुंड असलेल्या सर्व ठिकाणी दोन शिप्टमध्ये जवळपास ६०० पूर्णवेळ अधिकारी- कर्मचारी तसेच स्वयंसेवक यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत.
यामध्ये आरोग्य विभाग , बांधकाम विभाग, वाहन विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, आपत्कालीन विभाग आणि अतिक्रमण विभाग त्याचबरोबर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय यांचा समावेश आहे. त्याचबरोबर १६ आयशर टेंपो,५ ट्रॅक्टर, २ यांत्रिक बोटी, २ रुग्ण वाहिका,१ अग्निशमन वाहन अशी यंत्रणा सुसज्ज ठेवणेत येणार आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, विद्युत अभियंता संदीप जाधव,
अभियंता बाजी कांबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, विजय पाटील, स्वच्छता निरीक्षक सुरज माळगे, विशाल आवळे आदी उपस्थित होते.
तरी इचलकरंजी
शहरातील नागरिकांनी आपल्या घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन शहापुर खण येथे किंवा आपल्या घराजवळच्या कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्ती विसर्जित करून पर्यावरण पूरक आणि आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800