तर्कतीर्थांच्या साहित्यात परिवर्तनाची मोठी शक्ती व प्रेरणा आहे-प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तर्कतीर्थांच्या साहित्यात परिवर्तनाची मोठी शक्ती व प्रेरणा आहे-प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन

इचलकरंजी ता.१० तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी हिंदू धर्म सुधारणा,अस्पृश्यता निर्मूलन ,मंदिर प्रवेश, आंतरजातीय विवाह आदी विविध क्षेत्रात केलेले कार्य व विचाराची मांडणी ही त्यांच्या स्वातंत्र चळवळ, भाषा,साहित्य आणि सांस्कृती क्षेत्रातील भूमिकेशी सुसंगतच होती.त्यांनी नवभारत व नवमहाराष्ट्राचे जे एकरुप स्वप्न आणि पुरोगामी चित्र उराशी बाळगले होते त्याचे वर्तमानाला विस्मरण झाल्यासारखी स्थिती आहे.अशावेळी तर्कतीर्थांच्या समग्र वाङ्मयाचे नव्या पिढीने पुनर्वाचन सुरू केले तर त्यात भारताच्या सध्याच्या धर्मांध स्थितीत परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आणि प्रेरणा आहे.तर्कतीर्थ पढीक पंडित नव्हे तर कर्ते समाज -संस्कृती सुधारक होते.वैदिक संस्कृतीचा इतिहास आणि हिंदू धर्माची समीक्षा हे त्यांचे ग्रंथ म्हणजे सुधारणावादी विचारांची भगवद्गीता आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत लेखक , संपादक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : जीवन व साहित्य ‘ या विषयावर बोलत होते.तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित,समीक्षक, लेखक, प्राच्यविद्यापंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. तसेच त्यांनी भारतीय राज्यघटनेचे संस्कृतमध्ये भाषांतर करून मोठे काम केले. त्यांच्या समग्र साहित्याचे अठरा खंड प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी नुकतेच संपादीत केले आहेत. तसेच येत्या जानेवारीपासून तर्कतीर्थांचे १२५ वे जन्मवर्ष सुरू होत आहे .या पार्श्वभूमीवर हे व्याख्यान आयोजित केले होते. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यातून तर्कतीर्थ व आचार्य शांताराम बापू गरूड यांचे ऋणानुबंध स्पष्ट करून तर्कतीर्थ समाजवादी प्रबोधिनीत व्याख्यानासाठी आलेल्या आठवणींना उजाळा दिला. शशांक बावचकर यांनी प्राचार्य डॉ.लवटे यांचा शाल व ग्रंथ देऊन सत्कार केला. तसेच प्रमुख उपस्थित असलेल्या प्राचार्य डॉ. जी.पी.माळी व प्रकाश इनामदार यांचा ग्रंथ देऊन जयकुमार कोले यांनी सत्कार केला.

प्राचार्य डॉ. लवटे  म्हणाले, महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा सिंहाचा वाटा आहे .विसावे शतक अनुभवलेले प्रज्ञावंत लेखक, विचारवंत असलेल्या तर्कतीर्थाना भारतवर्षाच्या बहुविधेचे भान होते. त्यांच्या प्रज्ञेचा व बौद्धिकतेचा धाक संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतभर होता. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील सक्रिय सहभागापासून ते जगभरच्या विविध धर्म परिषदांत,संमेलनात धर्माची मांडणी करण्यापर्यंत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना राजकारण ते समाजकारण या प्रवासात मार्गदर्शन करण्यापासून ते विश्वकोशाच्या निर्मितीपर्यंत विविध क्षेत्रात सतत सत्तर वर्षे कार्यरत असलेले तर्कतीर्थ हे महाराष्ट्राचे पुरोगामी प्रबोधक होते,

प्राचार्य डॉ.लवटे पुढे म्हणाले, औपचारिक शिक्षण न घेतलेले पंडित असेलेल्या तर्कतीर्थानी धर्मशास्त्रा पासून मार्क्सवादा पर्यंत सतत सत्तर वर्षे लोकप्रबोधनाचे काम केले. श्रुती ,स्मृती ,पुराणे उपनिषदे यासह सर्व विद्याशाखांचा त्यांचा मोठा व्यासंग होता. त्यांनी इथल्या जात वास्तवाची समीक्षा केली होती. संस्कृत पंडित ते आक्रमक क्रांतिकारक आणि भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीपासून आदिवासींच्या संघटनेच्या उभारणीपर्यंत विविध क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली. स्वातंत्र्य आंदोलनाच्या अखेरच्या दशकात मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा तर्कतीर्थांवर मोठा प्रभाव पडला ते गांधींचे टीकाकारही झाले. जे आपल्या तर्कबुद्धीला पटते त्याच्याशी ठाम राहणे,त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी तर्कतीर्थानी आयुष्यभर ठेवली.हिंदू धर्मात घुसलेल्या सनातनी रूढी ,परंपरांचा  विरोध ज्ञाती सभा, धर्म परिषदा ,सर्वधर्म चर्चांमध्ये सहभागी होत त्यांनी निकराने केला. हिंदू धर्म साहित्य हे सनातनी,पारंपारिक नसून वैश्विक उदारमतवादी असल्याने त्यांनी स्पष्ट केले. हे मांडत असताना ते सर्व प्रकारच्या निंदेला टीकेला सामोरेगेले..त्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथातून त्यांनी धर्म आणि संस्कृती याची चर्चा केली. भारत वर्षातील विविध जाती-धर्माच्या एकजिनसी पणातून आकाराला आलेल्या हिंदू संस्कृतीची मिमांसा केली. जात धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा त्यांनी कशा चुकीच्या आहेत हे दाखवून दिले. महाराष्ट्राची पुरोगामी व प्रतिगामी अशी परस्पर विरोधी वाटणी न करता एक तिसरा एकत्रित विधायक विचारांचा महाराष्ट्र घडावा असे त्यांना वाटत होते. तर्कतीर्थाच्या जीवन व साहित्याचा अतिशय व्यापक अशा पट अनेक उदाहरणांसह डॉ. लवटे यांनी आपल्या पावणेदोन तासाच्या अभ्यासपूर्ण भाषणात मांडला. समग्र तर्कतीर्थ संपादना मागील हकीकतही विशद केली. वैचारिक साहित्यात न रमणे हे वास्तव सध्याच्या बौद्धिक विपन्नतेचे लक्षण आहे. तसेच सामाजिक स्मरणशक्ती कमी असल्यामुळे तर्कतीर्थांसारख्या  मोठी वैचारिक उंची असलेल्या व्यक्तिमत्वाला आपण आजवर पुरेसे जाणू शकलो नाही अशी खंत व्यक्त केली. मात्र नवा महाराष्ट्र व नवा भारत सर्वार्थाने व्यापक, प्रगत करायचा असेल तर तर्कतीर्थांची मांडणी लक्षात घेऊनच वाटचाल करावी लागेल असे स्पष्ट केले.

समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेले या कार्यक्रमास सुषमा दातार , शहनाज मोमिन,डॉ.तुषार घाटगे ,प्रा.शांताराम कांबळे, प्रा. एन .एम. कांबळे, सचिन पाटोळे ,अशोक केसरकर, शकील मुल्ला, रामदास कोळी, पांडूरंग पिसे,बजरंग लोणारी, संदीप चोडणकर, राजाराम बोंगार्डे, किरण कटके, नौशाद शेडबाळे, युसुफ तासगावे यांच्यासह विविध क्षेत्रातील जिज्ञासू उपस्थित होते. प्रा.रमेश लवटे यांनी आभार मानले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More