पोलीस कर्मचारी रमले, पुस्तकांच्या विश्वात
इचलकरंजी
– गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त, सुरक्षा अशा कामात व्यस्त असणारे पोलीस कर्मचारी पुस्तकांच्या विश्वात आणि ग्रंथालयात काही तास रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. निमित्त होते वाचन प्रेरणा दिनाचे. येथील आपटे वाचन मंदिराच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना बोलावून वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. यावर्षी इचलकरंजी मधील शिवाजीनगर पोलीस ठाणे, शहापूर पोलीस ठाणे आणि इचलकरंजी गावभाग पोलीस ठाणे तसेच ट्रफिक पोलीसांना बोलावून वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम करण्यात आला. चार विभागातून आलेल्या पोलीसांचे ग्रंथालयातर्फे स्वागत करण्यात आले. ग्रंथालयातील शंभर वर्षापूर्वीची जुनी पेंटीग्ज, संदर्भ विभागातील दुर्मिळ ग्रंथ पोलीसांनी उत्सुकतेने पाहिली. वाहतुक पोलीसांनी याप्रसंगी की राजवाडा चौकात अनेक वर्षे सेवा दिली पण ग्रंथालयात येणे झाले नव्हते. ग्रंथालयात सन्मानाने बोलावून आमचे स्वागत केल्याने भारावून गेल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी मांडलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची पाहणी पोलीसांनी केली. अनेक पुस्तके हाताळली. ग्रंथालयाच्या बजाज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्रत्येक विभागांच्या पोलीसांनी केले. इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्याचे पीएसआय मा. किशोर अंबुटकर, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथक प्रमुख पीएसआय मा. उर्मिला खोत आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पीएसआय किशोरी साबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक ग्रंथालयाचे संचालक राजेंद्र घोडके यांनी केले. कार्यवाह माया कुलकर्णी, सहकार्यवाह डॉ. कुबेर मगदूम, संचालक अॅड. स्वानंद कुलकर्णी, प्रा. मोहन पुजारी यांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी पीएसआय उर्मिला खोत यांनी मनोगत व्यक्त केले. या ग्रंथालयात आल्यानंतर वाचाल तर वाचाल या उक्तीची आठवण होते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.सुहास शिंदे या पोलीस कर्मचारी यांनी स्वरचित कविता सादर केली.ग्रंथालयाचे संचालक काशिनाथ जगदाळे यांनी आभार मानले. इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवेसाो यांचे याकामी सहकार्य लाभले. दिवसभर ग्रंथालयात विविध शाळांमधील मुलांनी भेट दिली. या मुलांकडून विविध साहित्यप्रकारांचे वाचन करुन घेण्यात आले. दिवसभराच्या उपक्रमात ग्रंथालयाचे संचालक डॉ. प्रा. सुजीत सौंदत्तीकर, मीनाक्षी तंगडी सहभागी झाले. ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभराच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800