विठ्ठल चोपडे निवडणूक रिंगणात-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदांचा राजीनामा.
इचलकरंजी
आगामी इचलकरंजी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याने महायुतीतल्या घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर राहणे हा विरोधाभास आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाचा आदर ठेवून नाईलाज म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. पक्षाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नावे ईमेल करून तसेच त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पोहोचवण्यासाठी औद्योगिक आघाडी प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपणी यांचेकडे आज सुपूर्द केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली.
५ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांची या पदावर निवड झाली होती. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये इचलकरंजी शहरांमध्ये त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघातील पाचही गावांमध्ये चांगल्या पद्धतीने पक्षाचे संघटन करण्यात आले होते. पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत चिकाटीने आणि जिद्दीने पक्षाची उभारणी केली होती. पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीकरिता जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मागणीही करण्यात आली होती. पण महायुतीच्या धोरणामुळे येथील विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाकडे असल्याने या जागेवर त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती.
इचलकरंजी शहराच्या दहा वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या पाणी प्रश्नाच्या सोडवूनुकीसाठी गेल्या अनेक वर्षापासून चोपडे यांनी प्रचंड प्रयत्न केले होते. पाणी प्रश्न हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.त्यामुळे तेच हा पाणी प्रश्न सोडवू शकतील तसेच शहरातील विविध प्रश्नांची त्यांना जाण असल्यामुळे त्यांच्या अभ्यासू नेतृत्वात ते या प्रश्नांची तड लावू शकतील हा कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा विश्वास असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवावी, यासाठी जनमताच आग्रह लक्षात घेऊन त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणे हा विरोधाभास वाटत असलेले त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा नेतृत्वाकडे सादर केला आहे. या घडामोडीमुळे विठ्ठल चोपडे निवडणूक लढवणार की त्यांच्यावर पक्षाचा दबाव येऊन ते या निवडणुकीतून माघार घेणार? हा प्रश्न आता संपुष्टात आलेला असून,आगामी निवडणुकीत चोपडे हे उमेदवार असणार हे आता स्पष्ट झालेले आहे.
चोपडेंची भूमिका बदलली:
गेल्या महिन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विठ्ठल चोपडे यांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केल्याचे स्पष्ट करताना महायुतीच्या तिन्ही पक्षात समन्वय असल्याचे सांगितले होते,मात्र अचानक निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने उलट सुलट चर्चा होत आहेत

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800