‘संविधान विशेषांक ‘ आमदार अरुण लाड यांचे हस्ते प्रकाशित O
इचलकरंजी ता.२१ समाजवादी प्रबोधिनीचे लोकप्रबोधनाचे सातत्यपूर्ण काम अतिशय महत्त्वाचे आहे. प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या संविधान विशेषांक म्हणजे संविधानाच्या तत्त्वज्ञानाच्या लोक जागरणासाठी मौलिक स्वरूपाची वैचारिक शिदोरी आहे असे मत पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाच्या संविधान विशेषांकाचे प्रकाशन करतांना समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यालयात बोलत होते. प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
येत्या २६ नोव्हेंबर या संविधान दिनी संविधानाच्या मंजुरीचे अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण होत आहे.संविधानाच्या मूल्यांच्या जागरणाचा प्रसार आणि प्रचार समाजवादी प्रबोधिनी स्थापनेपासून अर्थात १९७७ पासून करत आलेली आहे. राजकारण, समाजकारण , अर्थकारण आदी सर्व धोरणांमध्ये भारतीय संविधानाचे तत्वज्ञान केंद्रस्थानी असले पाहिजे यासाठी गेली ४७ वर्षे समाजवादी प्रबोधिनी सतत प्रयत्न करत आहे. त्यासाठीचा विचारजागर लेखणी व वाणीच्या माध्यमातून करत आलेली आहे. या पार्श्वभूमीवर संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ” प्रबोधन प्रकाशन ज्योती ” मासिकाचा दिवाळी अंक ‘ संविधान विशेषांक ‘ म्हणून समाजवादी प्रबोधिनीने प्रकाशित केला आहे. १६४ पृष्ठांच्या या अंकात संविधानाच्या विविध पैलूंवर प्रा. डॉ.अशोक चौसाळकर, प्रा.डॉ.भालबा विभूते, प्रा.डॉ.भारती पाटील, प्रा.डॉ. प्रकाश पवार,ज्येष्ठ पत्रकार डॉ. दशरथ पारेकर, प्रा.डॉ. सूर्यकांत गायकवाड, डॉ. विवेक घोटाळे,डॉ. नेहा वाडेकर, डॉ. सचिन भोसले आणि या अंकाचे संपादक प्रसाद कुलकर्णी यांचे अभ्यासपूर्ण लेख आहेत. प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे सकस विचारांची शिदोरी दिली जाते. दरवर्षी अंदाजे नऊशेहून अधिक छापील पृष्ठांचा मजकूर देणाऱ्या या मासिकाचे सर्वांनी वर्गणीदार वाचक व्हावे असे आवाहन या अंकाचे संपादक व प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800